साडेतीन लाख जणांची रोज विषाची परीक्षा
By Admin | Updated: December 21, 2015 00:37 IST2015-12-21T00:08:40+5:302015-12-21T00:37:42+5:30
पंचगंगा प्रदूषण : नदीकाठच्या गावांना धोका; साथीच्या रोगांनी नागरिक हैराण

साडेतीन लाख जणांची रोज विषाची परीक्षा
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाने उच्चतम पातळी गाठल्यामुळे नदीचे पात्र नाला बनण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास गांधीनगर ते नृसिंहवाडी या टप्प्यातील नदीकाठच्या २६ गावांतील पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे. याची झळ सध्या या गावांना बसत असून, अशीच परिस्थिती राहिल्यास या गावांना सुजलाम, सुफलाम् बनविणारी हीच पंचगंगा या गावातील सुमारे साडेतीन लाख लोकांचा कर्दनकाळ ठरेल. पंचगंगेच्या प्रदूषणाचा व उपाययोजनांचा वेध घेणारी मालिका आजपासून...
अतुल आंबी ल्ल इचलकरंजी
कोल्हापूर जिल्ह्यात शहरीकरण व औद्योगिकीकरण जसे वाढत गेले, तसे मैलायुक्त सांडपाणी व रासायनिकयुक्त विषारी पाणी नाल्यांच्या माध्यमातून पंचगंगा नदीमध्ये थेट मिसळले जाऊ लागले. सुरुवातीला याची तीव्रता लक्षात न आल्याने उपाययोजनांकडे सर्वच पातळीवर डोळेझाक करण्यात आली. त्यात पंचगंगेला बारमाही स्वच्छ व शुद्ध पाणी असल्याने, तसेच जलचर प्राणी व वनस्पती यांचे मोठे प्रमाण असल्याने या दूषित पाण्याचा एवढा प्रादुर्भाव जाणवत नव्हता. त्यात राधानगरी धरणातून एक-दोन वेळा पाणी सोडल्यास हे प्रदूषण कमी व्हायचे व होणारी टीकाही थांबत होती.
मात्र, आता पंचगंगा प्रदूषणाचे अक्राळविक्राळ रूप समोर येत आहे. मैलायुक्त सांडपाणी व कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाणी रोखण्यात केलेल्या जुजबी यंत्रणा उघड्या पडल्या आहेत. प्रदूषणामुळे जलचर प्राण्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, तर गांधीनगर ते नृसिंहवाडी या नदीकाठच्या परिसरातील २६ गावांचे तीन लाख ४८ हजार ९४६ लोक हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. दोन लाख ९२ हजार लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहरालाही काहीवेळा या नदीतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे साथींच्या रोगांनी या गावांना आपला विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. (क्रमश:)
सांडपाणी रोखण्यासाठी केलेल्या जुजबी यंत्रणा उघड्या पडल्या
मैलायुक्त व रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत
इचलकरंजीतील तीन लाख लोकांनाही
काहीवेळा केला जातो पंचगंगेतून पाणीपुरवठा
अनेक गावे पितात विनाप्रक्रिया पाणी
पंचगंगा नदीच्या प्रदूषणास शहरे मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. मात्र, शहरात पाणी शुद्धिकरण प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा केला जातो आणि नदीकाठच्या अनेक गावांना मात्र विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे या गावांमध्ये दूषित पाण्यापासून होणारे अनेक आजार ग्रामस्थांना जखडलेले असतात. याउलट शहराच्या तुलनेत या गावांमध्ये शासनाच्या आरोग्य सेवाही तोकड्या स्वरूपाच्याच आहेत.
नदीकाठची गावे
हातकणंगले, हालोंडी, हेर्ले, माणगाव, रुकडी, साजणी, तिळवणी, पुलाची शिरोली, चिंचवाड, पट्टणकोडोली, गांधीनगर, रुई, कबनूर, चंदूर, अब्दुललाट, रांगोळी, इंगळी, शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी, शिरढोण, धरणगुत्ती, नांदणी, हरोली, आगर, हेरवाड या गावांचा समावेश आहे; तर इचलकरंजी शहरालाही काहीवेळा या नदीतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. इचलकरंजीची लोकसंख्या दोन लाख ९२ हजार आहे. म्हणजेच गांधीनगर ते नृसिंहवाडी या मार्गावरील सुमारे साडेसहा लाख लोकांना पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे.
६७ किलोमीटरचा प्रवास
पंचगंगा नदीचा उगम प्रयाग चिखली याठिकाणी झाला आहे. तेथून ६७ किलोमीटरचा प्रवास करत ही नदी नृसिंहवाडी या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते. या नदीमध्ये कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि धामणी या पाच नद्यांचा समावेश आहे. अनादी कालापासून पाच नद्यांचा समावेश असलेल्या या पंचगंगा नदीतील पाणी काठावरील गावे पित आहेत. मात्र, सध्या नदीचे पाणी पिण्याचे सोडाच, ते अंघोळीच्याही लायकीचे राहिलेले नाही.
एकीकडे डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या विरोधी कायदा करून शासन यावर पर्याय उपलब्ध करीत आहे. मात्र, नदीकाठच्या गावातील लोकांना मैलामिश्रित पाणी प्यावे लागत आहे,
हे किती मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.