साडेतीन लाख जणांकडे ‘पंतप्रधान विमा’
By Admin | Updated: June 1, 2015 00:51 IST2015-06-01T00:44:44+5:302015-06-01T00:51:50+5:30
जिल्ह्णात प्रचंड प्रतिसाद: एकविस दिवसांत विक्रमी लोकांनी घेतला लाभ, ३१ आॅगस्टपर्यंत मुदत

साडेतीन लाख जणांकडे ‘पंतप्रधान विमा’
भीमगोंडा देसाई - कोल्हापू प्रधानमंत्री सुरक्षा’ आणि ‘जीवनज्योती बीमा’ योजना केंद्र शासनाने सुरू केल्यानंतर केवळ २१ दिवसांत जिल्ह्णातील साडेतीन लाख जणांनी हा विमा उतरविला आहे. याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तसेच काही सहकारी बॅँकामध्येही विमा उतरविण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत असलेली ही मुदत वाढवून आता ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत करण्यात आली आहे.
विमा योजनांची अंमलबजावणी ९ मेपासून सुरू झाली आहे. बँकांनी आपल्या खातेदारांना एसएमएसद्वारे विमा उरविण्याचे आवाहन केले. याशिवाय शासनाने सर्व संस्था, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, अन्य स्थानिक स्वराज्य संस्था यांना आदेश देऊन इच्छुुक खातेदारांचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. वर्षाचा विमा हप्ता कमी आणि दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण असल्यामुळे मध्यमवर्गीय, सर्वसामान्य खातेदारही याचा लाभ घेत आहेत. बँकेत खाते असल्यास आधार कार्डच्या झेरॉक्ससह, वारसदाराचे नाव आणि जन्मतारखेसह विहित नमुन्यातील अर्ज भरून दिल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्यामुळे बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकेत विमा घेण्यासाठी सुरुवातीपासून गर्दी कायम आहे.
सुरक्षा बीमा योजनेतून विमा संरक्षणासाठी वार्षिक हप्ता फक्त १२ रुपये आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणालाही याचा लाभ घेता येतो. हा विमा उतरविलेल्याचा अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना व पूर्ण अपंगत्व आल्यास संबंधितांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. हप्ता नाममात्र असल्यामुळे या विम्यास अधिक लोक पसंती देत आहेत. जीवन ज्योती विमा योजनेतून १८ ते ५० वर्षे वयोगटातील आधार कार्डधारक कोणतीही व्यक्ती विम्याचा लाभ घेऊ शकते. हा विमा असलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणांनी मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी वार्षिक विमा हप्ता ३३० रुपये आहे. विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांत तसेच काही सहकारी बॅँकांत खाते असल्यास एकाच बँकेतून हा लाभ घेता येणार आहे.
दोन्ही विमा योजनेतून कमी दिवसांत जिल्ह्णातील साडेतीन लाख खातेदारांनी विमा उतरविला आहे. वार्षिक हप्त्याची रक्कम कमी असल्यामुळे बहुतेकांनी सुरक्षा विमा योजना उतरविणे पसंत केले आहे. विमा उतरविण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
- एम. जी. कुलकर्णी,
व्यवस्थापक, अग्रणी बँक, कोल्हापूर