मुश्रीफांच्या आमिषामुळे हजारो तरुण देशोधडीला
By Admin | Updated: June 30, 2015 00:22 IST2015-06-30T00:08:42+5:302015-06-30T00:22:19+5:30
संजय घाटगे : आमच्या कर्मचारी मुलांचे उत्तरदायित्व करायला आम्ही समर्थ

मुश्रीफांच्या आमिषामुळे हजारो तरुण देशोधडीला
साके : मुश्रीफांनी निवडणुकीपूर्वी कारखान्यात फारच कमी कामगार लागत असतानाही हजारो तरुणांना नोकरीचे आमिष दाखविले. जिल्हा बँकेत घेतो आणि केडरमध्ये घेतो म्हणूनही अनेकांना पाठीमागून फिरवत त्यांचे संसार उद्ध्वस्त केले. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी सवय असणाऱ्या मुश्रीफांनी पहिल्यांदा या देशोधडीला लागलेल्या हजारो तरुणांच्या नोकऱ्यांचे बघावे. आमच्या कर्मचारी मुलांचे उत्तरदायित्व करायला आम्ही समर्थ आहोत, असा प्रतिटोला सोमवारी माजी आमदार संजय घाटगे यांनी लगावला.
व्हनाळी (ता. कागल) येथे पत्रकारांशी ते बोलत होते. माझ्या व्यापामुळे आणि दुग्ध व्यवसायातील अस्थिरतेमुळे या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या सात्ताप्पा महेकर यांना मी प्रकल्प यशस्वीरीत्या चालवण्याकरिता बरोबर घेतले आहे, असे स्पष्ट करून घाटगे म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत संस्था केवळ मोडूनच खाल्ल्या, त्यांना यातले काय कळणार नाही. संताजी कारखान्याच्या उसाची बिले भागवा आणि मग आमच्या संस्थांची काळजी करा. जिल्हा बँक ताब्यात मिळाली, तर मुश्रीफ व त्यांच्या बगलबच्च्यांनी ती लुटून देशोधडीला लावली. यावेळी कै. माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांनी प्रशासक आणला, म्हणून ती बँक वाचली. दुसऱ्याचे चांगले लुटून आणि मोडून खाण्याची सवय असणाऱ्या मुश्रीफांचा सार्वजनिक जीवनातला भ्रष्टाचाराचा पूर्वइतिहास पाहता शेतकरी हितासाठीच मी त्यांना बँकेत रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण राष्ट्रवादीला जिल्ह्यातील नेत्यांच्या पुढे लोटांगण घालायला लावून ‘गोकुळ’मध्ये माझ्या पत्नीला उमेदवारी मिळू नये म्हणून केलेला अट्टाहास मुश्रीफ लगेचच विसरले.
...अन्यथा मुश्रीफ जेलमध्ये असते
मुश्रीफांच्या कर्तृत्वापेक्षाही कै. माजी खासदार मंडलिकांची पुण्याई पाठीशी होती म्हणूनच मुश्रीफ निवडून आले. नाहीतर ते स्वत:च्या हिमतीवर काहीच करू शकत नाहीत हे अलीकडच्या निवडणुकांवरून स्पष्टच झाले आहे. मुश्रीफांची कृष्णकृत्ये मंडलिकांच्या सावलीखाली झाकून गेली, अन्यथा आज मुश्रीफ जेलचीच हवा खात बसले असते, असेही संजय घाटगे म्हणाले.