सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा केली हजारो रुपयांची औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:11+5:302021-05-17T04:22:11+5:30
अनिल पाटील मूरगूड :यमगे ता. कागल येथील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर रुपयापासून दोन हजार ...

सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा केली हजारो रुपयांची औषधे
अनिल पाटील
मूरगूड :यमगे ता. कागल येथील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर रुपयापासून दोन हजार रुपयांपर्यंत असे सुमारे तीस हजार रुपये जमा केले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यातून आवश्यक असणारी औषधे खरेदी करून नुकतीच प्रदान केली. गावात संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. युवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलेल्या या कार्याचे गावकऱ्यांकडून आणि सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
यमगे येथील तरुणांनी गावातील बऱ्या वाईट घटना तत्काळ लोकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून व्हॉट्सअपवर युवा स्पोर्ट्स या नावाने दोन ग्रुप तयार केले.यावर गावातील विविध समस्यांवर चर्चा होते.
सद्या गाव कोरोनापासून सुरक्षित आहे. एकदा दुसरा कोरोना रुग्ण आहे. पण आजूबाजूच्या गावात कोरोनाचा प्रसार मोठा आहे.यामुळे सहज ग्रुपवर एका तरुणाने कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आपण निधी संकलित करूया असा संदेश टाकला. लगेच त्याला दोन्ही ग्रुपवरील सर्वांनी प्रतिसाद देत डिजिटल पद्धतीने निधी संकलित करण्यास सुरुवात केली.
दोन दिवसात तीस हजार रुपये जमा झाले. यातून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना बाधित रुग्णासाठी कोण कोणती औषधे लागतात त्याची माहिती घेऊन साधारणतः पन्नास हजाराची औषधे थेट कंपनीशी संपर्क साधून कमी किमतीत आणून ती लगेच आरोग्य केंद्रात सुपुर्द केली. जरी गावातील रुग्ण संख्या शंभर झाली तरी ती औषधे पुरतील असा विश्वास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.या तरुणांनी भविष्यात असा निधी परत संकलित करून मिनी व्हेंटिलेटर,ऑक्सिजन सिलिंडर आणि रुग्णसंख्या वाढली तर कोविड सेंटर उभा करण्याचा विश्वास दिला.
हे साहित्य गावचे सरपंच दिलीपसिंह पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी तानाजी शिंदे, सुनील पाटील,दीपाली लोकरे,विशाल पाटील, विशाल दारवाडकर, सुहास सोरप,के.एम. गुरव,एम.आर. समाधान, तानाजी कुंभार आदी उपस्थित होते.