हजारो शेतकरी जलसमाधी घेणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST2021-09-02T04:52:22+5:302021-09-02T04:52:22+5:30
माजी खासदार राजू शेट्टी : घुणकी येथील बैठकीत इशारा लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : महापूर २०१९ पेक्षा यावेळी ...

हजारो शेतकरी जलसमाधी घेणारच
माजी खासदार राजू शेट्टी : घुणकी येथील बैठकीत इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : महापूर २०१९ पेक्षा यावेळी जादा भरपाई दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारला जाग आणण्यासाठी उद्या १ सप्टेंबरपासून प्रयाग चिखली येथून आक्रोश मोर्चा व परिक्रमेला प्रारंभ होईल. पंचगंगेची परिक्रमा नृसिंहवाडी येथील पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमावर ६ सप्टेंबरला जाईल. शासनाने धोरण जाहीर केले नाही तर हजारो शेतकऱ्यांसमवेत जलसमाधी घेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
घुणकी (ता. हातकणंगले) येथे आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची या निमित्त शेतकऱ्यांचा मेळावा झाला. या वेळी शेट्टी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, केंद्र शासनाच्या १२ आॅगस्टच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना उसाला प्रतिहेक्टर १३,५०० रुपये व खरीप पिकास ६५०० रुपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वरील मदत स्वीकारणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, शाखाध्यक्ष सुधीर मगदूम, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव जाधव यांची भाषणे झाली.
या वेळी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, तालुका उपाध्यक्ष संपत पोवार,अण्णा मगदूम, शिवाजी आंबेकर, मदन डाळे, रघुनाथ सिद, सुनील पवार, प्रकाश मगदूम, उत्तम निकम, रामभाऊ पाटील, अशोक मगदूम उपस्थित होते.
फोटो ओळी : घुणकी येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी. समोर शेतकरी.