‘त्या’ चिमुकल्यांना आजपासून मिळणार कपडे
By Admin | Updated: November 30, 2014 23:58 IST2014-11-30T23:47:17+5:302014-11-30T23:58:45+5:30
लोकमत इनिशिएटिव्ह

‘त्या’ चिमुकल्यांना आजपासून मिळणार कपडे
कोल्हापूर : शहरातील विविध झोपडपट्टी वसाहतींमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून ‘लोकमत’ने मांडली. कपड्यांच्या माध्यमातून त्यांना माणुसकीची ऊब देण्याचे आवाहन केले. त्यानंतर मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले. विविध सामाजिक, कामगार, शैक्षणिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी कपडे संकलन मोहिमेत सहभाग घेतला. त्याद्वारे संकलित झालेल्या कपड्यांचे उद्या, सोमवारपासून ‘अवनि’ संस्थेच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. त्याची सुरुवात दुपारी एक वाजता कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना कपडे देऊन केली जाणार आहे.
वंचित मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘अवनि’ने ‘लोकमत’च्या उपक्रमात सहभागी होण्यासह नागरिकांकडून मिळणारे कपडे एकत्रित संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला. शिवाय भाऊसिंगजी रोडवरील ‘एकटी’ संस्थेच्या कार्यालयात कपडे संकलनाची मोहीम सुरू केली. गेल्या १९ दिवसांच्या मोहिमेला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी शाळा, सामाजिक, कामगार, शैक्षणिक संस्थांनी ‘एकटी’च्या कार्यालयात कपडे जमा केले. सुमारे दोन ते अडीच हजार मुलांना देता येतील इतके कपडे संकलित झाले आहेत. या कपड्यांचे ‘अवनि’ने विविध मुलांच्या वयांनुसार वर्गीकरण केले आहे. संकलित झालेल्या कपड्यांच्या वाटपाला उद्या राजाराम साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या वसाहतीपासून सुरुवात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)