उद्धव गोडसेकोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पाटगावचे बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी पाटगाव जंगलातून ताब्यात घेतलेली राख एसआयटीने तपासणीसाठी मुंबईतील कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठवली होती. तपासणीचा अहवाल आला असून, त्यात मानवी डीएनएचे कोणतेही अंश सापडले नाहीत. अहवालावरून ती राख पिळणकर यांची नसल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तपासाची दिशा बदलल्याचे पोलिसांनी सांगितले.पाटगावचे सरपंच पिळणकर सात जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी गावातून बेपत्ता झाले. पोलिसांना तपासादरम्यान पाटगावच्या जवळच जंगलात राख मिळाली होती. त्या राखेत मानवी अवशेष आहेत काय? याच्या शोधासाठी कोल्हापुरातील फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण केले होते. त्यांनी घटनास्थळी पोहोचून राखेची तपासणी केली होती. मात्र, त्यात मानवी अवशेष असल्याचे पुरावे मिळाले नव्हते. त्या राखेची पुन्हा दुसऱ्या लॅबकडून तपासणी करण्याची मागणी नातेवाइकांनी केली होती.त्यानुसार जप्त केलेली राख एसआयटीने मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवली होती. तपासणीचा अहवाल आला असून, त्यात मानवी डीएनएचे अंश आढळले नाहीत. त्यामुळे जंगलातील राख पिळणकर यांची नसल्याचे स्पष्ट झाले आहे.राखेचा पुरावा निरुपयोगी ठरल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. पिळणकरांच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्स काढून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पुन्हा चौकशी केली जात आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात केलेले आर्थिक व्यवहार, मध्यस्थी, खरेदी-विक्री याची माहिती काढली जात आहे. खबऱ्यांद्वारे पाटगाव परिसरातून गोपनीय माहिती काढण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. यातून एखादा सुगावा हाती लागेल असा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
गूढ वाढलेबेपत्ता पिळणकरांचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या तपासाबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्याला पूर्णविराम देण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केली. एसआयटीच्या स्थापनेला तीन आठवडे उलटूनही काही ठोस माहिती तपासातून समोर आलेली नाही. त्यामुळे बेपत्ता पिळणकरांचे नेमके काय झाले? याचे गूढ आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.
जंगलात मिळालेल्या राखेत मानवी शरीराचे अंश नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता इतर शक्यतांचा तपास सुरू आहे. पिळणकरांबद्दल काही माहिती असल्यास नागरिकांनी एसआयटीशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. - रामदास इंगवले - पोलिस उपअधीक्षक, एसआयटी प्रमुख
Web Summary : Forensic report reveals forest ashes aren't human, deepening the mystery surrounding missing ex-village leader Mahesh Pilankar. Police are now exploring new leads, re-examining financial records, and seeking information from contacts.
Web Summary : फोरेंसिक रिपोर्ट से पता चला कि जंगल की राख इंसानी नहीं है, जिससे लापता पूर्व ग्राम नेता महेश पिलणकर का रहस्य गहरा गया है। पुलिस अब नए सुराग तलाश रही है, वित्तीय रिकॉर्ड की दोबारा जांच कर रही है और संपर्कों से जानकारी मांग रही है।