ठोंबरे, जाधव यांना पुरस्कार
By Admin | Updated: June 5, 2015 00:16 IST2015-06-04T00:32:23+5:302015-06-05T00:16:22+5:30
शिवराज्याभिषेक दिनी वितरण : संयुक्त शिवाजी पेठेचा कार्यक्रम

ठोंबरे, जाधव यांना पुरस्कार
कोल्हापूर : संयुक्त शिवाजी पेठेच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षीपासून ‘शिवराज्यभूषण पुरस्कारा’चे वितरण करण्यात येणार आहे. यंदा मर्दानी खेळांचे प्रशिक्षक आनंदराव ठोंबरे व उद्योजक चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. निवृत्ती चौकातील अर्धा शिवाजी पुतळा, शिवाजी पेठ येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी सात वाजता या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षाचालक सेना जिल्हाप्रमुख राजू जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जाधव म्हणाले, संयुक्त शिवाजी पेठ, निवृत्ती तरुण मंडळ, निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळ यांच्यातर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदापासून समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या दोन व्यक्तींना ‘शिवराज्यभूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदा वस्ताद आनंदराव ठोंबरे व उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
निवृत्ती चौकात दररोज सायंकाळी सात वाजता विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हलगीवादन स्पर्धा, मराठमोळी वेशभूषा स्पर्धा, धनगरी ढोल स्पर्धा, शाहिरीचे सादरीकरण करण्यात आले होते.
शिवराज्याभिषेक दिनी ६ जून रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ५१ लिटर दुधाचा विधिवत व धार्मिक पद्धतीने अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसाद वाटप केला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
याप्रसंगी सतीश पाटील, सचिन पोवार, अमर भोसले, सयाजी घोरपडे, संजय सासने, रामभाऊ इंगवले, सुनील मगदूम, श्रीकांत चिले, राजाराम काटे, वसंत पाटील, विनायक शिंदे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे एक हजार किलो तांदूळ
रायगडावर शनिवारी (दि. ६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त चालवण्यात येणाऱ्या अन्नछत्रासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे एक हजार किलो तांदूळ देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांच्याकडे हा तांदूळ सुपूर्द केला. यावेळी अमर पाटील, गिरीष कुलकर्णी, उदय घोरपडे, प्रशांत तहसीलदार, प्रवीण पोवार, मयूर तांबे, प्रसन्न मोहिते, प्रशांत पटेल, गणेश जाधव उपस्थित होते.