तीस उमेदवारांना उत्तरपत्रिका पुरविली!

By Admin | Updated: January 13, 2016 01:34 IST2016-01-13T01:27:07+5:302016-01-13T01:34:15+5:30

पेपरफुटी प्रकरण : डझनभर एजंट सहभागी; फुलारेने प्रश्नपत्रिका काढली बाहेर; आष्ट्यात बनविली उत्तरपत्रिका

Thirty candidates provided the answer sheets! | तीस उमेदवारांना उत्तरपत्रिका पुरविली!

तीस उमेदवारांना उत्तरपत्रिका पुरविली!

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित व छापखान्यातील कनिष्ठ बार्इंडर याने परीक्षेदिवशी पहाटेच छापखान्यातून प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन एजंटांची ही प्रश्नपत्रिका घेऊन त्याची उत्तरपत्रिका आष्टा (ता. वाळवा) येथे बनविली. त्यानंतर ही उत्तरपत्रिका तीस उमेदवारांना पुरविल्याचे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये ‘डझन’भर खासगी एजंटांचा सहभाग आहे. त्यांची नावेही निष्पन्न झाली आहेत.
दीड महिन्यापूर्वी आरोग्य सेविका व औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा झाली. या परीक्षेला करगणी (ता. आटपाडी) येथील शाहीन जमादार ही बसली होती. तिने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरु केले होते. त्यावेळी पेपरफुटीचे हे प्रकरण उघडकीस आले होते. शाहीन कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून काम करीत होती, तर तिला मदत करणाऱ्या कवलापूर (ता. मिरज) येथील शाकिरा उमराणी हिलाही अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात नऊजणांना अटक केली आहे, तर बारा संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
रामदास फुलारे हा जिल्हा परिषदेच्या छापखान्यात कनिष्ठ बार्इंडर आहे. त्याच्या उपस्थितीत आरोग्य सेविका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची छपाई केली होती. छपाईनंतर त्याने पहाटे प्रश्नपत्रिका बाहेर काढली. ती त्याने किरण कदम या एजंटाला दिली. कदमने त्याचा भाचा शशांक जाधव यास सोबत घेऊन सकाळी सात वाजता आष्टा गाठले. तिथे त्यांनी उत्तरपत्रिका बनविण्याचे काम सुरु केले. पण काही प्रश्नांची उत्तरे सोडविता आली नाहीत. त्यामुळे ते पुन्हा सांगलीत आले. दोन डॉक्टरांची मदत घेऊन त्यांनी उत्तरपत्रिका पूर्ण तयार केली.
किरण कदम व शशांक जाधव या ‘मामा-भाचे’ जोडीने कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक संजय कांबळे-भुई (रा. हरिपूर), सफाई कामगार सतीश मोरे व एजंट सचिन कुंभार यांना झेरॉक्स काढून उत्तरपत्रिका दिली. सचिनने आणखी पाच एजंटांना गाठून उत्तरपत्रिका पास केली. या पाच एजंटांनी (नावे समजू शकली नाहीत) तब्बल १९ उमेदवारांना ही उत्तरपत्रिका दिली. संजय कांबळे याने शाकिरा जमादार हिच्याकडून साडेसहा लाख रुपये घेऊन तिला उत्तरपत्रिका दिली. त्यानंतर त्यांनी एजंट मंदार कोरे, शीतल मुगलखोड यांनाही उत्तरपत्रिका दिली. मंदार व शीतलने पुढे पाच उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून आर्थिक सौदा करुन उत्तरपत्रिका दिली. अशाप्रकारे प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यापासून ते त्याची उत्तरपत्रिका बनविणे व ती एजंटामार्फत उमेदवारांना पुरविण्याची यंत्रणा राबली आहे. सध्या तरी तीस उमेदवारांना ही सोडविलेली उत्तरपत्रिका फिरविली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी दोन संशयितांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी जिल्हा न्यायालयात निर्णय होणार आहे. (प्रतिनिधी)

न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला

संशयित संजय कांबळे व किरण वसंतराव कदम (रा. जयंिसंगपूर, ता. शिरोळ) यांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर मंगळवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने दोघांचाही जामीन फेटाळला आहे. यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.

टोळी मालामाल : उमेदवार कंगाल

पेपरफुटीच्या प्रकरणात राबलेली टोळी आर्थिक बाजूने मालामाल झाल्याचे दिसून येते. तीस उमेदवारांकडून प्रत्येकी साडेसहा लाख रुपये त्यांनी घेतले असतील, तर ही रक्कम १ कोटी ९५ लाखांच्या घरात जाते. हा विषय आरोग्य सेविका पदाच्या परीक्षेचा झाला. पण औषध निर्माण पदाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्येही अशीच कोट्यवधीची उलाढाल झाली असण्याची शक्यता आहे. आरोग्य सेविका पदाची फेरपरीक्षा झाली आहे. मात्र ज्यांनी या टोळीला लाखो रुपये दिले आहेत, ते मात्र कंगाल झाले आहेत.

दोघांना बनविले साक्षीदार
किरण कदम व शशांक जाधव या ‘मामा-भाचे’ जोडीने सांगलीतील ज्या दोन डॉक्टरांकडून उत्तरपत्रिका बनवून घेतली आहे, त्या डॉक्टरांना पोलिसांनी साक्षीदार केले आहे. त्यांच्या नावाबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. त्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: Thirty candidates provided the answer sheets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.