प्रस्थापित राजकीय पक्षांना तिसरा पर्याय
By Admin | Updated: November 20, 2015 00:26 IST2015-11-20T00:23:50+5:302015-11-20T00:26:03+5:30
लक्ष्मण मानेंची माहिती : ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ला आयोगाची मान्यता

प्रस्थापित राजकीय पक्षांना तिसरा पर्याय
कोल्हापूर : सध्याच्या राजकीय पक्षांना कोणतीही विचारसरणी राहिलेली नाही. त्यांची धोरणे एकसारखी आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांना आता ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ या पक्षाद्वारे तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पक्षाला भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष माने म्हणाले, देशातील सध्याचे राजकीय पक्ष हे एकसारखेपणाने कार्यरत आहेत. त्यांना पर्याय म्हणून आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ कार्यरत राहील. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ही या पक्षाची मूल्ये आहेत. एस.टी. बचाव, डोनेशनशिवाय शिक्षण, शेती बचाव आणि जाती हटाव अशी त्रिसूत्री घेऊन आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत. यात एस. टी. बचावसाठी नागरिकांना पहिल्यांदा एस.टी.तून प्रवास करण्याची विनंती केली जाईल. सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे यासाठी डोनेशनला विरोध करण्यात येईल. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण उधळून लावणे; तसेच समाजवादी समाजरचनेसाठी आग्रही उपक्रम राबविले जातील. जातिअंताची लढाई बळकट केली जाणार आहे. आमचा पक्ष भारतीय नागरिकांचा आहे. यात जात, धर्म, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात आंदोलन आणि सभासद नोंदणी हाती घेतली जाणार असून, लवकरच त्याची सुरुवात केली जाईल. या पत्रकार परिषदेस पक्षाचे उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव, अॅड. पंडितराव सडोलीकर, जगन्नाथ जाधव, सज्जनसिंह चितोडिया, विलास तमाईचीकर, समशेरसिंह कलानी, पप्पूसिंग चितोडिया उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पक्षाचे काम अधिकृतपणे सुरू होणार
सन २०१४ मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पुण्यात ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली. मात्र, पक्षाची नोंदणी झाली नसल्याने त्याची अधिकृतपणे सूचना केली नव्हती. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबरला पक्षाला मान्यता दिली आहे. त्यानुसार आता पक्षाचे अधिकृतपणे काम सुरू होणार आहे.