‘राजाराम’चा ५० चा तिसरा हप्ता लवकरच
By Admin | Updated: September 5, 2014 23:27 IST2014-09-05T23:12:06+5:302014-09-05T23:27:05+5:30
महादेवराव महाडिक : को-जनरेशन प्रकल्प कारखाना स्वत: राबविणार

‘राजाराम’चा ५० चा तिसरा हप्ता लवकरच
कसबा बावडा : ऊस उत्पादकांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून एफ.आर.पी.पेक्षा जादा १०० चा दुसरा हप्ता दिला असून, ताळेबंदाप्रमाणे एकूण ऊस दर २४०० प्रतिटन बसत असल्याने उर्वरित ५० रुपये लवकरच दिले जातील, असे प्रतिपादन आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
महाडिक म्हणाले, सन २०१३-१४ मध्ये साखर आयात केल्याने देशातील साखरेचे भाव उतरले. त्यामुळे कारखान्यांना मोठा तोटा झाला. साखर उद्योगास प्रायॉरिटी सेक्टरचा दर्जा देऊन पतपुरवठा चार ते सहा दराने करावा, आयात-निर्यात धोरण दीर्घकालीन ठेवावे, साखर निर्यातीपोटी केंद्र व राज्य शासनाचे अनुदान वेळेत मिळावे, इथेनॉलच्या निर्मितीस चालना द्यावी, तसेच साखर उद्योगास आयकरातून वगळल्यास या उद्योगापुढील अडचणी काही प्रमाणात कमी होतील. महाडिक म्हणाले, बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर को-जनरेशन प्रकल्प उभारणीसाठी टेंडर्स मागविण्यात आली होती; परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कारखाना आता स्वत:च हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यास परवानगी मिळावी म्हणून तसा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठविला आहे. १२ ते १५ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प झाल्यास चांगला दर देता येईल.
अध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्वागत करून कामकाजाचा आढावा घेतला. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन मुख्य सल्लागार पी. जी. मेढे यांनी केले. उपाध्यक्ष लहू शामराव पाटील यांनी आभार मानले. प्रभारी कार्यकारी संचालक आर. सी. पाटील, माजी महापौर शिवाजीराव कदम, नगरसेवक नानासो कदम, कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, वडगाव बाजार समितीचे सभापती शहाजी पाटील, जयसिंग खामकर, के. पी. चरापले, आदींसह सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी )