पादत्राणे चोरणाऱ्या चौघींना अटक
By Admin | Updated: November 9, 2014 23:39 IST2014-11-09T01:40:28+5:302014-11-09T23:39:09+5:30
दीड लाखाचा ऐवज : राजारामपुरी नववी गल्ली येथे फोडले होते गोदाम

पादत्राणे चोरणाऱ्या चौघींना अटक
कोल्हापूर : एक महिन्यापूर्वी राजारामपुरी नववी गल्ली येथील नाईके कंपनीचे गोदाम फोडून दीड लाख किमतीची पादत्राणे चोरणाऱ्या चार महिलांना आज, शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित ताई वाल्मीकी फुलोरे (वय ३५), अश्विनी दत्ता नाईक (२२), बायडी सागर रसाळ (२५), छाया राजू सोनटक्के (३२, सर्व रा. राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, राजारामपुरी नववी गल्ली येथे एस. एस. आय. पी. एल रिटेल लिमिटेड ह्या कंपनीचे नाईके नावाचे गोदाम आहे. याठिकाणी महिला व पुरुषांसाठी वापरण्यात येणारी पादत्राणे ठेवण्यात आली आहेत. दि. १० आॅक्टोबर रोजी हे गोदाम फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाख किमतीचे २८ बुटांचे जोड आणि हॅँडग्लोव्हज लंपास केले होते. याप्रकरणी व्यवस्थापक किशोर बबन बाबर (२९, रा. मंगळवार पेठ) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या चोरीची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे विभागाच्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी संशयित चौघा महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)