चोरट्याने तपासाची दिशा भरकटविली
By Admin | Updated: December 2, 2014 00:46 IST2014-12-02T00:45:15+5:302014-12-02T00:46:09+5:30
मूळचा कोल्हापूरचा ; इंगळेचे खरे नाव दौडके असल्याचे तपासात पुढे

चोरट्याने तपासाची दिशा भरकटविली
सावंतवाडी : आंबोली पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांच्या टोळीतील सदाशिव रामा इंगळे याने आपले नाव पोलीस दप्तरी खोटे सांगितले असून, त्याचे खरे नाव सदाशिव रामा दौडके असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तसेच तो बेळगावचा नसून, कोल्हापूर येथील असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
आंबोली येथे चार दिवसांपूर्वी चोरट्यांची टोळी पकडली होती. या टोळीतील मुख्य सूत्रधार सदाशिव रामा इंगळे याने आपण बेळगाव येथील असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी बेळगाव येथे जाऊन खात्री केली असता, तो बेळगाव येथील नसून, कोल्हापूर येथील असल्याचे पुढे आले. तसेच त्याचे आडनाव इंगळे नसून, दौडके असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दौडके हा सराईत चोरटा असून, तो नावे बदलून चोऱ्या करीत असतो; परंतु पोलिसांनी त्याचे खरे नाव शोधून काढले आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा नंबरही खोटा निघाला आहे. तो नंबर कोल्हापूर येथील शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या दुचाकीचा असून, त्यांचा या गुन्ह्यांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे दौडके हा खोटे बोलून तपासाची दिशा भरकटवित असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी सांगितले. कुडाळमधील एका महिलेचाही या गुन्ह्याशी संबंध असल्याचे त्याने सांगितले होते; पण अद्याप काहीही निष्पन्न झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)