बावड्यात चोरट्यांनी चार बंगले फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:06+5:302021-06-20T04:18:06+5:30
कसबा बावडा : कसबा बावड्यातील आनंदस्वरूप पार्क येथील तीन तर शाहू कॉलनीतील एक असे चार बंद असलेले बंगले ...

बावड्यात चोरट्यांनी चार बंगले फोडले
कसबा बावडा : कसबा बावड्यातील आनंदस्वरूप पार्क येथील तीन तर शाहू कॉलनीतील एक असे चार बंद असलेले बंगले फोडून चोरट्यांनी ७ तोळे दागिने, रोख १ लाख रुपये, ३ एलईडी टीव्ही, चांदीचे दागिने असा सुमारे साडेपाच ते सहा लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याबाबत शाहूपुरी पोलिसात नोंद झाली असून घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. चोरी झालेल्या चार बंगल्यांपैकी तीन बंगले हे पोलिसांचे आहेत. आनंद स्वरूप पार्कातील सहायक फौजदार रमेश गणपत हजारे हे रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. त्यांच्या आई दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंगल्याला कुलूप होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून एलईडी टीव्ही, कपाटातील सोन्याची माळ, गंठण, अंगठी, रिंगा असा ७ तोळ्याचा ऐवज व आईच्या उपचारांसाठी आणून ठेवलेले एक लाख रुपये लंपास केले. चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर राहत असलेले राहुल सर्जेराव साळोखे यांच्या बंद असलेल्या बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून टाकले. मात्र सुदैवाने येथे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. याच कॉलनीतील सचिन केशव बेंडकुळे यांचा बंद बंगलाही चोरट्यांनी फोडला. या बंगल्यातील एलईडी टीव्ही व चांदीचे दागिने लंपास केले.
या कॉलनीच्या शेजारीच असलेल्या शाहू कॉलनील तानाजी कलगे यांचा बंगला फोडून एलईडी टीव्ही लंपास केला.
फोटो : कसबा बावड्यातील आनंद स्वरूप पार्कमधील रमेश हजारे यांच्या बंगल्यातील कपाट चोरट्यांनी फोडून सात तोळे सोने व १ लाख रुपये लंपास केले.