अधिकाऱ्यांच्या गाडीवर मृत मासे टाकले
By Admin | Updated: March 7, 2015 01:02 IST2015-03-07T00:53:09+5:302015-03-07T01:02:54+5:30
पंचगंगा प्रदूषणप्रश्न : शिरोळ बंधाऱ्यावर आंदोलक संतप्त; मंगळवारी इचलकरंजीत बैठक

अधिकाऱ्यांच्या गाडीवर मृत मासे टाकले
कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी शिरोळ तालुक्यातून नागरिकांच्या संतप्त भावना उमटल्या. पाहणी करण्यास आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांना संतप्त नागरिकांनी शिरोळ बंधाऱ्यावर पाण्यात उतरूनच पाणी पहावे यासाठी नदीपात्रात ओढले. यावेळी अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात झोंबाझोंबी झाली. अखेर अधिकाऱ्यांनी पाण्यात उतरून प्रदूषित पाण्याला कारणीभूत असणाऱ्या घटकावर महानगरपालिका आयुक्त, इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांची मंगळवारी
(दि. १०) बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
पंचगंगा नदीमध्ये महानगरपालिका, जयंती नाल्याचे सांडपाणी, इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त फेस व उग्रवास येत आहे. परिणामी नदीतील मासे मरत असल्याने ‘लोकमत’मधून ‘पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी’ या मथळ्याखाली शुक्रवारी (दि. ६) च्या अंकात पंचगंगेचे वास्तव व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मांडण्यात आला होता. या वृत्तामुळे शिरोळ तालुक्यातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता. वृत्तामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी होळकर नदीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी येणार असल्याची माहिती या प्रदूषणप्रश्नी आवाज उठविणारे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बंडू बरगाले यांना मिळाली होती. बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आले होते. दुपारी दोनच्या सुमारास उपप्रादेशिक अधिकारी होळकर, क्षेत्रअधिकारी राजेश आवटी, केंदुळे आदी आले. अधिकारी येताच संतप्त आंदोलनकर्ते व नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत प्रदूषण करणाऱ्या कारखानदाराबरोबर साटेलोटे असल्याचा आरोपही केला. अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यावर राहून पाहणी व पंचनामा करीत असल्याने ‘आम्ही हेच पाणी पितो, तुम्ही पाणी पिऊ नका, किमान पाण्यात उतरल्यानंतर तर पाण्याचा अनुभव घ्या’, असा हट्ट करत आंदोलनकर्त्यांनी होळकर यांना पाण्यात ओढण्यात आले. उपप्रादेशिक अधिकारी होळकर यांनी संयम राखत पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या साखर कारखाने, नगरपालिका, महानगरपालिका व औद्योगिक कारखान्यांना दंडात्मक कारवाई केल्याचे सांगितले. मंगळवारी (दि. १०) बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. यावेळी बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, बंडू बरगाले, शहाजी गावडे, प्रकाश माने, प्रदीप मगदूम, अंकुश माने, सागर पाटील, शिवाजी माने, सतीश माने, बाबासो मालगावे यांच्यासह शिरढोण, जयसिंगपूर, शिरोळ येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.