कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हा प्रयत्न नसून सर्व तालुक्यातील सभासदांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आहे. त्यामुळे खासदार महाडिक यांना याबाबत दिल्लीला जाण्याची वेळ येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या सभेत संचालकांची संख्या वाढवण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. त्यावर हरकत घेत, या विषयाची सर्व नेत्यांशी चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी केली होती. त्यानंतर, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती.
याबाबत, मंत्री मुश्रीफ म्हणाले संचालक मंडळाची संख्या वाढवणे व बिनविरोध निवडणुकीचा काहीही सबंध नाही. महादेवराव महाडिक व धनंजय महाडिक यांचा याबाबतचा झालेला गैरसमज दूर करू. त्यामुळे त्यांना यासाठी दिल्लीला जाण्याची गरज भासणार नाही.महायुती म्हणूनच निवडणूक लढवूआगामी सर्वच निवडणूक महायुती म्हणून लढवणार आहोत. ‘गोकुळ’ची निवडणूकही महायुती म्हणूनच लढवणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.