शिरोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन कपात होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:40+5:302021-06-09T04:29:40+5:30
शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतन जुन्या पद्धतीनेच दिले जाईल, त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे सरपंच ...

शिरोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन कपात होणार नाही
शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतन जुन्या पद्धतीनेच दिले जाईल, त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे सरपंच शशिकांत खवरे यांनी स्पष्ट केले. शिरोली ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग्रामपंचायत पदाधिकारी, कामगार संघटनेचे नेते, कर्मचारी यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच खवरे यांनी लेखापरीक्षण अहवालात ग्रामपंचायतीचा कर वसूल हा कामगारांच्या वेतनावर खर्च होत असल्याने इतका खर्च करता येणार नाही, असे लेखा परीक्षकांनी सांगितले होते. त्यामुळे कामगारांची वेतन कपात झाली होती. याबाबत आठ दिवसांत निर्णय घेऊ असे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले होते. पण विरोधी महाडिक गटाने विनाकारण राजकारण केल्याचा आरोप खवरे यांनी केला. ग्रामपंचायतीचे ७३ कर्मचारी हे माझ्या गावचे आहेत. त्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.
कोरोना महामारीच्या काळात याच कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गावासाठी जीवाची पर्वा न करता सेवा दिली आहे. सध्या ग्रामपंचायतीकडे घरफाळा वसुली होत नाही. त्यामुळे निधीची कमतरता आहे. पण तरीही कामगारांचे वेतन आजपर्यंत कधीच थांबवले नाही आणि इथून पुढेही थांबणार नसल्याचे खवरे यांनी सांगितले.
तत्पूर्वी, सरपंच शशिकांत खवरे उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, सरदार मुल्ला, प्रकाश कौंदाडे, बाजीराव सातपुते, ज्योतिराम पोर्लेकर उत्तम पाटील, मुन्ना सनदे, संदीप कांबळे, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. भोगण, अमित शिंदे, सुजित समुद्रे, कामगार संघटनेचे नेते अप्पा पाटील, गिरीश फोंडे, नामदेव गावडे यांची सुमारे तासभर चर्चा झाली. यामध्ये कर्मचारी वेतनवाढीचा प्रश्न पुढे आला. यावर कोरोना संपल्यानंतर वेतन वाढ करण्यात येईल. तसेच कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात येतील असे सांगितले.
फोटो : ८ शिरोली कामगार बैठक
शिरोली ग्रामपंचायत कामगारांच्या वेतनासंदर्भात आयोजित बैठकीत सरपंच शशिकांत खवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच सुरेश यादव, प्रकाश कौंदाडे, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. भोगण, कामगार नेते अप्पा पाटील, गिरीश फोंडे, नामदेव गावडे उपस्थित होते.