मॅनेज होणार नाही, संवादातून मराठा समाजाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:37+5:302021-06-28T04:17:37+5:30

कोल्हापूर : येथील मूक आंदोलनाची दखल घेवून राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यासंंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री सतेज ...

There will be no management, justice to the Maratha community through dialogue | मॅनेज होणार नाही, संवादातून मराठा समाजाला न्याय

मॅनेज होणार नाही, संवादातून मराठा समाजाला न्याय

कोल्हापूर : येथील मूक आंदोलनाची दखल घेवून राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यासंंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले.

कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळावर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि आरक्षणप्रश्नी १६ जून रोजी मूक आंदोलन केले. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी सरकारशी केलेल्या संवादातून कोणत्या मागण्या मान्य झाल्या, पुढील दिशा कोणती राहणार, यासंबंधीची माहिती देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे येथील भवानी मंडपात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण फेटाळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करीत राहिले. पर्यायावर कोणी बोलायला तयार नाही. म्हणून मी समाजाला न भडकवता शांततेच आवाहन करीत महाराष्ट्रभर दौरा करून पर्यायाचा विचार केला. आम्ही सूचवलेल्या पर्यायावर सरकार कार्यवाही करीत आहे.

मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर येत सरकारचे लक्ष वेधले. याची दखल देश आणि जगाने घेतली आहे. त्यानंतर पुन्हा मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांसाठी रस्त्यावर आणणे बरोबर वाटत नाही. आता कोरोनाची महामारी आहे. अशा स्थितीमध्ये संयमाने सरकारशी संवाद साधत मागण्या मान्य करून घेण्याची भूमिका घेतली. सरकारच्या चर्चेचे निमंत्रण स्वीकारले. यातून सारथीचे तातडीने उपकेंद्र येथे सुरू झाले. तारादूतांची नेमणूक करणे, सारथीला निधी देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून सुलभपणे कर्ज मिळवून देणे आदी मागण्यांवर कार्यवाही सुरू झाली आहे. संवादामुळे हे शक्य झाले आहे. छत्रपतींच्या घराण्यातील वारसदार म्हणून आंदोलन करण्याला माझा विरोध नाही. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण कोरोना महामारीच्या काळात आंदोलनाने काय साध्य होणार आहे, याचाही विचार झाला पाहिजे.

चौकट

ओबीसीतून आरक्षण

द्या असे म्हणणार नाही

खासदार संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समजतेचा विचार मांडला. त्यांचा वारसदार म्हणून मी ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार नाही. जे जे वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी माझी भूमिका कायम राहणार आहे. ते कसे द्यायचे ते सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे आहे.

Web Title: There will be no management, justice to the Maratha community through dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.