राज्यात मोदी लाट नव्हती
By Admin | Updated: November 14, 2014 23:33 IST2014-11-14T23:28:00+5:302014-11-14T23:33:48+5:30
प्रकाश पवार : कॉँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होता असंतोष

राज्यात मोदी लाट नव्हती
इचलकरंजी : नवउदारमतवादात फायदा शोधणाऱ्या नव्या पिढीने कल्याणकारी राज्य संस्थेचा अंत आणि सामाजिक न्यायाचा पराभव घडवून आणला. राज्यात मोदी लाट नव्हती, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातील लाट होती. मोदी मतदारांच्या मनातील असंतोषाला वाचा फोडत होते. त्यामुळे त्याचे रुपांतर मतपेटीत होत गेले. हा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा अन्वयार्थ आहे, असे मत राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
येथील समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी रमेश लवटे यांनी स्वागत व प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
पवार म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण डाव्या नव्हे, तर उजव्या वळणाकडे जात आहे. सामाजिक जडणघडणीत मोठे बदल घडत आहेत. आज नागरी समाज, उद्योगजगत, बाजारपेठा आणि सोशल मीडिया ७० टक्के राजकारण करीत आहे. अर्थात ते भाजपला पूरक असे राजकारण आहे. मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी या सर्वच समाजात होणारे बदल भाजपला मोठी मदत करीत आहेत. कॉँग्रेसने केलेला विकास त्यांना मांडता आला नाही. माध्यमांनी भाजपला नायक व कॉँग्रेसला खलनायक प्रकारात सादर केले. केवळ मराठा हे मुद्दे आता कालबाह्य झाले असून, मराठी पाठीचा कणा चार ठिकाणी तुटला आहे. यासह महाराष्ट्राच्या राजकारणात विविध स्तरावर होत जाणारे बदल मांडत पवार यांनी अन्वयार्थ मांडला. अन्वर पटेल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)