आली गवर.. सोन पावली आली...
By Admin | Updated: September 3, 2014 00:15 IST2014-09-03T00:15:43+5:302014-09-03T00:15:43+5:30
घरोघरी गौरीचे आगमन : पंचगंगा नदीकाठी रंगला झिम्मा- फुगडी

आली गवर.. सोन पावली आली...
कोल्हापूर :
‘सोनियाच्या पावलांनी,
गवर आली माहेराला।
गवर आली माहेराला,
भाजी भाकर जेवायाला।।
भाजी भाकर जेवली,
रानोमाळी हिंडली।
रानोमाळी हिंडली,
पानाफुलांनी बहरली...।।
अशा पारंपरिक गीतांच्या साथीने घरोघरी गौराईचे आगमन झाले. पाना-फुलांनी बहरलेल्या आणि हळदी-कुंकवाच्या पावलांनी घराचा उंबरठा ओलांडताना पावलागणिक धन-धान्य, माणिकमोती, सुख-शांती समृद्धी घेऊन येणाऱ्या गौरीची लाडक्या गणरायाच्या शेजारी प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेश आगमनानंतर गौराईचे स्वागत होते. माहेरावाशीण म्हणून आलेल्या गौरीला पहिल्या दिवशी भाजी, भाकरी, वडीचा नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीच्या सुग्रास पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. माहेरी आलेल्या पत्नीला आणि गणरायाला बोलावायला पाठोपाठ शंकरोबा येतो. या परिवार देवतांच्या प्रतिष्ठापनेने घराघरांत मांगल्य, समृद्धी आणि उत्साह, आनंदाची बरसात होते.
आज, मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान काठाच्या नऊवारी साडीसह अंबाड्यावर माळलेला गजरा, नाकात नथ, सोन्याच्या अलंकारांनी सजलेल्या महिला पंचगंगा नदीकाठावर गौराईच्या पूजनासाठी जमल्या. तांब्याच्या तांब्यात नदीचे पाणी घेऊन त्यात हळदी-कुंकू, सुपारी, तांदूळ, रुपया, दुर्वा घालून त्यावर गवर ठेवली. समोर पाच खडे पुजून गणपती आणि गौरीची आरती झाली. त्यानंतर घाटावरच रंगला झिम्मा-फुगडीचा खेळ...‘आली गवर आली, सोन पावली आली... सोनियाच्या पावलांनी, गवर आली माहेराला...’, ‘आट्या पाट्या चंदनी लाट्या’, अशा पारंपरिक गीतांवर महिलांनी फेर धरला आणि हातात गौरी घेऊन घराकडे निघाल्या.
दारात सडा, रंगीबेरंगी रांगोळ्या काढून पाटावर तांब्याच्या तांब्यात पाणी, दुर्वा, हळद-कुंकू, सुपारी, रुपया टाकून त्यावर गौरीची वनस्पती चाफ्याच्या पानात बांधून बसवली. दारापासून गौरीची प्रतिष्ठापना करेपर्यंतच्या जागेत रांगोळीने लक्ष्मीची पावले काढली. अन् गणपती बाप्पाच्या शेजारी विराजमान झाली.
गणपती आणि गौरीची आरतीनंतर देवीला भाजी-भाकरी, वडी, दही-भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. उद्या, बुधवारी गौरी पूजनाचा दिवस असतो. यादिवशी शंकरोबाची प्रतिष्ठापना होते. (प्रतिनिधी)