इचलकरंजी पालिका सभेत प्रचंड गोंधळ

By Admin | Updated: July 10, 2015 01:09 IST2015-07-10T01:04:37+5:302015-07-10T01:09:18+5:30

माईकची आदळाआपट : खुर्च्यांची फेकाफेक

There was a lot of confusion in the Ichalkaranji municipality meeting | इचलकरंजी पालिका सभेत प्रचंड गोंधळ

इचलकरंजी पालिका सभेत प्रचंड गोंधळ

इचलकरंजी : येथील नगरपालिकेची विशेष सभा सुरू असताना मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी सभागृहाबाहेर जाताना नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर बसविले. उपनगराध्यक्ष रणजित जाधव सभागृहात असताना ‘शविआ’च्या जाधव यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर बसविल्याने कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत नगराध्यक्षांच्या टेबलाकडे धाव घेतली. यावेळी ‘शविआ’चे नगरसेवकसुद्धा तेथे आल्याने शाब्दिक चकमक उडून प्रचंड गोंधळ उडाला. माईकची आदळाआपट, आरोप-प्रत्यारोप, खुर्च्या फेकणे, अशा वातावरणामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला.
नगराध्यक्षा बिरंजे यांनी विविध २६ विषयांवर नगरपालिकेची विशेष सभा बोलावली होती. साडेअकरा वाजता सुरू झालेल्या सभेमध्ये सुरुवातीलाच कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन दीड महिना लोटला, तरी कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसल्याचा विषय उपस्थित केला. त्यावर बोलताना मुख्याधिकारी सुनील पवार यांनी हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत.
संवर्ग अधिकारी मूळ पदाच्या ठिकाणी हजर झाल्यानंतर बदल्यांच्या ठिकाणी उपस्थित झाले नसलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पालिकेचा आयजीएम दवाखाना पब्लिक / प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला कॉँग्रेसने जोरदार (पान २ वर)

अविश्वासाचा अण्णांचा आदेश
सभागृहामध्ये कॉँग्रेसकडून होणारा कडवा विरोध पाहता ‘शविआ’चे पक्षप्रतोद जाधव यांनी ‘नगराध्यक्षांवरील अविश्वासाचा आदेश अण्णांनी दिल्यामुळे सभागृहामध्ये नगराध्यक्षांना धारेवर धरत आहात’, असे म्हणताच संतप्त झालेल्या कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जाधव यांना चुकीचे बोलू नका, असे सुनावले.

तांब्या-वाटीही भिरकावली
उपनगराध्यक्षांना डावलून अजित जाधव अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टेबलावर येऊन माईकची आदळआपट केली, तर एक माईक फेकून दिला. याशिवाय पाणी पिण्यासाठी ठेवलेली तांब्या-वाटीसुद्धा भिरकावली.

राष्ट्रवादीतील फूट उघड
आयजीएम पीपीपी तत्त्वावर देण्याच्या विषयावर झालेल्या मतदानावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगरसेविका शुभांगी माळी व माधुरी चव्हाण यांनी ‘शविआ’च्या बाजूने मतदान केले, तर उर्वरित जांभळे गटाचे नगरसेवक कॉँग्रेसबरोबरच राहिले.

Web Title: There was a lot of confusion in the Ichalkaranji municipality meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.