‘गोकुळ’मध्ये अपप्रवृत्तीला थारा नाही
By Admin | Updated: September 7, 2014 23:18 IST2014-09-07T23:13:04+5:302014-09-07T23:18:11+5:30
पी. एन. पाटील : दूध संस्था कर्मचारी मेळावा; गतवेळी मतदारसंघ पुनर्रचनेमुळेच पराभव

‘गोकुळ’मध्ये अपप्रवृत्तीला थारा नाही
नागदेववाडी : स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही. गेल्या वेळेला मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळेच पराभव पत्कारावा लागला. आमदार नसतानाही विकासकामे मतदारसंघात केली. ही विकासाची दृष्टी केवळ कॉँग्रेसकडेच असून, ‘गोकुळ’मध्ये अपप्रवृत्तीला थारा नसल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केले.
करवीर मतदारसंघातील ‘गोकुळ’ संलग्न दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या फुलेवाडी येथे आज, रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील होते.
पाटील म्हणाले, कॉँग्रेस पक्षाने संस्था चांगल्या चालविलेल्या आहेत. दूध संघाचा कारभारही चांगला चालला असताना विरोधक खोटे-नाटे आरोप करून दिशाभूल करीत आहेत. आजपर्यंत संघात कोणत्याही अपप्रवृत्तीला थारा दिला नसल्याने संघाची वाटचाल यशस्वी सुरू आहे.
जिल्ह्याचे नेतृत्व करवीरच्या ताब्यात राहण्यासाठी पी. एन. पाटील यांचे हात बळकट करणे गरजेचे असल्याचे सांगत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब खाडे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक पाटील, दिलीप पाटील, प्रा. राजेखान शानेदिवाण, शामराव पाटील-वाळोलीकर, शंकरराव पाटील, केरबा कारंडे, विश्वास शामराव पाटील, रणजित शिंदे, शत्रुघ्न पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ‘गोकुळ’चे संचालक सुरेश पाटील यांनी स्वागत, तर विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. पी. डी. धुंदरे यांनी आभार मानले. निवास पाटील, शहाजी पाटील, उपसभापती दत्तात्रय मुळीक, बी. एच. पाटील, सुनील पाटील, बी. एम. पाटील, दत्ता पाटील, केरबा पाटील, शिवाजी कवठेकर, दूध संस्थांचे कर्मचारी उपस्थित
होते. (वार्ताहर)
ॉकर्मचाऱ्यांचे अनुदान वाढणार !
‘गोकुळ’ दूध संघ संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रतिलिटर ४० पैसे अनुदान देते. यामध्ये वाढ करत ५० पैसे अनुदान देण्याची सूचना पी. एन. पाटील यांनी अध्यक्ष दिलीप पाटील यांना केली.
बड्या नेत्यांचा ‘शब्द’
गेल्या वेळी ‘जनसुराज्य’ने पाठिंबा दिला; पण कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नाही. तालुक्यातील दोन बड्या विरोधी नेत्यांनी ‘पी. एन.’ना आमदार करण्याचा शब्द दिल्याचा गौप्यस्फोट पी. डी. पाटील यांनी केला; पण हे नेते कोण याची चर्चा सुरू होती.