राणेंचा राजकीय भूकंप नाहीच
By Admin | Updated: July 21, 2014 23:10 IST2014-07-21T23:01:32+5:302014-07-21T23:10:21+5:30
दीपक केसरकर : राणेंच्या प्रक्षोभक भाषणावर शासनाने कारवाई करावी

राणेंचा राजकीय भूकंप नाहीच
सावंतवाडी : उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या विरोधात बोलणाऱ्यांचे हात मुळापासून उखडून टाका, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यांची ही भाषा प्रक्षोभक असून, शासनाने भाषण तपासून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. राणेंनी राजकीय भूकंप घडविलाच नाही, असा उपरोधिक टोलाही यावेळी त्यांनी हाणला.
यावेळी आमदार केसरकर म्हणाले, मला विकास हवा आहे. माझे राणेंशी व्यक्तिगत भांडण नाही; पण त्यांनी टीका केली, तर मला त्याला उत्तर देणे भाग आहे, पण यापुढे शक्यतो टीकेला उत्तर देण्याचे टाळत विकासासाठी माझा हातभार कसा लागेल हे पाहणार आहे.
माझ्यावर केलेल्या व्यक्तिगत टीकेवर मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती, पण लोकसभेतील पराभवामुळे तरी राणे सुधारले असतील म्हणून ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती; पण आता पुन्हा त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली आहे. मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असून, गुन्हा दाखल करण्याची मागणीही शासनाकडे करणार आहे.
कणकवलीतील राणे यांचे भाषण प्रक्षोभक असून चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही राजकीय संस्कृती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे आमदार केसरकर यांनी म्हटले की, राणे हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार होते. तसेच ते राजकीय भूंकप घडविणार होते, पण तसे काहीच त्यांच्या बोलण्यातून दिसले नाही. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालाच नाही, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. (प्रतिनिधी)