रस्ते करण्याचे ‘नाटक’ नको
By Admin | Updated: April 4, 2015 00:04 IST2015-04-03T21:56:30+5:302015-04-04T00:04:11+5:30
जवाहरनगरात महिलांच्या प्रतिक्रिया : औद्योगिक, नागरी दोन्ही बाजूंनी वाताहत

रस्ते करण्याचे ‘नाटक’ नको
संतोष पाटील / गणेश शिंदे -कोल्हापूर राजर्षी शाहू महाराजांनी १९०६ साली चर्मोद्योगासाठी वसविलेल्या परिसरात आज १०० वर्षांनंतरही पायाभूत सुविधांची वाणवा आहे. येथील जवाहरनगर चौक येथे गुरुवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोजित व्यासपीठावर परिसरातील नागरिकांनी व्यथा मांडल्या. औद्योगिक व नागरी अशा दोन विभागांत विभागलेल्या या परिसरातील रस्ते, ड्रेनेज, कचरा उठाव, केएमटी अशा सहज सोडविता येणाऱ्या समस्यांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.जवाहरनगर मुख्य चौकात सायंकाळी साडेपाच वाजता ‘लोकमत आपल्या दारी’ या व्यासपीठावर परिसरातील महिला, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी समस्यांचा ऊहापोह केला. परिसरात यल्लमा देवालयापासून सुभाषनगर चौकातून रिंगरोडला जोडणाऱ्या १०० फुटी रस्त्याचे काम खोळंबले आहे. रस्त्याला दोन-तीनवेळा डांबर-खडी लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचे दुखणे ‘जैसे थे’ आहे. अशीच अवस्था अंतर्गत रस्त्यांचीही आहे. लोकांसह वाहनांची वर्दळ पाहता मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते चांगले व्हावेत. रस्ते करण्याचे ‘नाटक’ करू नका, अशी रोखठोक प्रतिक्रिया महिलांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
येथे उद्योग व नागरी वस्ती यांचे मोठे प्रमाण असूनही नियमित स्वच्छता केली जात नाही. रोगराई टाळण्यासाठी परिसराची स्वच्छता व्हावी, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे. येथील खेळाडू सरावासाठी शहरात जातात. त्यांच्यासाठी क्रीडांगण होणे आवश्यक आहे. लहानांसाठी बगीचा, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व्हावे. पाणी, गटारी या पायाभूत सुविधा भक्कम करण्यात याव्यात.
रिक्षाचालकांना दुजाभावाची वागणूक...
जवाहरनगर चौकात रिक्षाथांब्यावर रोज ४० ते ५० रिक्षा असतात. या रिक्षाचालकांना इतरत्र रिक्षा थांब्यावर गेल्यावर दुजाभावाची वागणूक देत असल्याच्या प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी यावेळी ‘लोकमत आपल्या दारी ’या उपक्रमात मांडल्या.
रस्ता अक्षरश: खिळखिळा
यल्लमा मंदिर ते सुभाषनगर चौकापर्यंत रस्ता अक्षरश: खिळखिळा झाला आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजलाईन आहे. रोज या रस्त्यावरून के.एम.टी. बससह अवजड वाहनांची वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. त्यामुळे ड्रेनेजलाईन रस्त्याखाली दबली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रस्त्यांची रुंदी वाढवा
यल्लमा मंदिर-रिंगरोड रस्ता शंभर फुटी व्हावा. गटारी स्वच्छ असाव्यात. शाहू सेना चौकापर्यंतचा रस्ता अरुंद करण्यात आला आहे. त्या रस्त्यांची रुंदी वाढवावी.
- कमलाकर व्हटकर
दुतर्फा गटारी कराव्यात
यल्लमा मंदिर ते सुभाषनगर चौक या रस्त्यावर दुतर्फा गटारी नाहीत. त्या कराव्यात. दुर्गंधीमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे.
- डॉ. राजकुमार पोळ
औद्योगिक दराचा भार
परिसरातील लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत महत्त्वाची पदे भूषविली; अद्यापही पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. हा भाग औद्योगिक परिसरात येत असल्याने घरफाळा व विद्युत बिलांची आकारणी औद्योगिक दराने केली जाते.
- निरंजन कदम
स्वच्छता व्हावी
जवाहरनगर परिसरातील अंतर्गत रस्ते व्हावेत.
भागामध्ये स्वच्छता होत नाही.
- शिवाजी संभाजी पोळ
शंभर फुटी रस्ता
सुभाष रोड रस्ता झालेला नाही. तो शंभर फुटी आणि लवकरात लवकर व्हावा.
- रमेश सोनवणे
डासांचे साम्राज्य
भागामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू, मलेरिया असे साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. तरी औषध फवारणी त्वरित करावी.
- चंद्रकांत व्हटकर
घंटागाडी यावी
गटारी अस्वच्छ आहेत. कचरा उठावासाठी घंटागाडी यावी. नगरसेवकांनी या प्रकरणी लक्ष द्यावे.
- राधा मोतीलाल पोळ
खणीची स्वच्छता
भागामध्ये जुनी खण आहे. या खणीची स्वच्छता व्हावी, तसेच दर्जेदार रस्ते करावेत.
- शंकरराव भोसले
मार्केटची गरज
परिसरात बगीचा व भाजी मार्केटची सोय नाही. तसेच उद्यान व मार्केट व्हावे.
- राहुल सोनवणे
आधारकार्ड मिळावे
गेल्या दोन वर्षांपासून आधारकार्ड आलेले नाही. रेल्वेस्थानक येथील पोस्ट कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता आमचेसुद्धा आधारकार्ड आलेले नाही, असे सांगितले जाते.
- प्रमिला सोनवणे
दुजाभाव का?
जवाहरनगरकडून वाय. पी. पोवारकडे जाणारा रस्ता नगरोत्थान योजनेमधून करण्यात आला; पण हा रस्ता करताना काहींचे कंपौंड पाडले आहे, तर काहींचे कंपौंड जसे आहे तसेच ठेवले आहे. हा दुजाभाव का?
- राजहंस सोनवणे
ड्रेनेजलाईनचा उपयोग काय?
परिसरातील खण भागात अंतर्गत ड्रेनेज करण्यात आले. परंतु, त्याचा वापर अद्याप नाही. मग, ड्रेनेजलाईन करून काय उपयोग? त्याचबरोबर काही बोळांमध्ये काँक्रीट केले आहे, तर काही ठिकाणी केलेले नाही.
- गणेश नारायणकर
भरपाई द्यावी
नगरोत्थानमधून कंपौंड पाडले आहे. त्यामुळे महापालिकेने एक तर पैसे द्यावेत, नाही तर कंपौंड बांधून द्यावे.
- पुष्पा सुभाष व्हटकर
अतिक्रमण काढा
बिजली चौक ते शिवाजी मंडळापर्यंतचा अंतर्गत रस्ता ३० फुटी
करावा. तसेच त्या रस्त्यावरील अतिक्रमण लवकर काढावे.
- ब्रहस्पती सिद्राम भोसले.