महापौरांना मदत करणाऱ्यांना थारा नाही
By Admin | Updated: March 15, 2015 00:44 IST2015-03-15T00:30:10+5:302015-03-15T00:44:44+5:30
‘राष्ट्रवादी-जनसुराज्य’ च्या बैठकीत निर्णय : उद्याच्या महापालिका सभेतील व्यूहरचना

महापौरांना मदत करणाऱ्यांना थारा नाही
कोल्हापूर : सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारून कोल्हापूरची तसेच राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्या महापौर तृप्ती माळवी यांना मदत करणाऱ्यांना पुढील काळात थारा दिला जाणार नाही, असा इशारा शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत देण्यात आला. तसेच जे नगरसेवक महापौरांना साथ देतील, त्यांना कोणत्याही प्रकारचा निधी दिला जाणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला.
माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री राष्ट्रवादी व जनसुराज्य आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत महापौरांचे लाच प्रकरण, त्याच्यापासून पक्षाची होत असलेली बदनामी, त्यांची राजीनामा न देण्याची भूमिका, महापौरांना महाडिक समर्थकांची होत असलेली मदत या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला. उपस्थित असलेल्या सर्वच नगरसेवकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यापुढे महापौर माळवी यांना मदत करणाऱ्या कोणाही नगरसेवकाला मदत करण्यात येऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केवळ विकासाची कामे केली आहेत. पक्षाने अनेक विकासाची कामे मंजूर करुन आणली आहेत. पारदर्शक कारभार केला. टीडीआर लाटला नाही की कोणाचे आरक्षण उठविले नाही. इतके चांगले काम केल्यानंतर महापौरांनी लाच स्वीकारल्याने पक्षाची बदनामी होत आहे. आमचा कोणाचाही त्यांना पाठिंबा नाही. त्यांना पदावरून हटविण्यासाठी सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. त्यांना पक्षातून काढून टाकण्याचीही प्रक्रिया सुरू आहे, परंतु त्यांना गेल्या काही दिवसांपासून आमदार महादेवराव महाडिक यांचे काही कारभारी मदत करताना दिसत आहेत. आमची महाडिक यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या कारभाऱ्यांना समजावून सांगावे. राष्ट्रवादीची बदनामी होत असल्याने आम्हालाही आता कठोर निर्णय घ्यावा लागेल. जर कोणी यापुढे महापौर माळवी यांना मदत करणार असेल, तर त्यांना थारा दिला जाणार नाही.
महापौरांनी राजीनामा न दिल्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाच प्रकरणातून जरी पक्षाची बदनामी होत असली, तरी आम्ही जनतेसमोर जाऊन आमची बाजू मांडू. कारण आम्ही केवळ विकासाची कामे केली आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. मुश्रीफ यांनी कारभाऱ्यांना दिलेला इशारा हा अप्रत्यक्षपणे आमदार महाडिक यांनाच असल्याचे मानले जाते. (प्रतिनिधी)