पुनर्रचित अभ्यासक्रम लादण्याची घाई नको
By Admin | Updated: July 17, 2015 00:06 IST2015-07-17T00:06:48+5:302015-07-17T00:06:48+5:30
सोनवणे यांना निवेदन : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांची मागणी

पुनर्रचित अभ्यासक्रम लादण्याची घाई नको
कोल्हापूर : पुनर्रचित अभ्यासक्रमांचे संघटना स्वागत करीत आहे. मात्र, हा निर्णय घाईगडबडीने न लादता विद्यार्थीहिताचा प्राधान्याने राज्य शासनाने विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या कोल्हापुरातील शिष्टमंडळाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. भा. सोनावणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात असे म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून राज्यात पुनर्रचित उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, शासनाची तयारी केवळ कागदोपत्री झालेली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमांचे संघटना स्वागत करीत आहे. मात्र, हा निर्णय घाईगडबडीने न लादता विद्यार्थीहिताचा प्राधान्याने शासनाने विचार करावा. उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम या शैक्षणिक अर्हतेचा समावेश शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांतील विविध पदांच्या सेवानियमावलीत करावा. नवीन अभ्यासक्रमांचा समावेश शिकाऊ उमेदवारी योजनेत करावा. त्याच अभ्यासक्रमात पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची दालने उघडणाऱ्या व्यवसाय शिक्षण विद्यापीठाची स्थापना करावी. त्यानंतरच शासनाने पुनर्रचित अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करावी. शिष्टमंडळात सुनील देसाई, मनोहर कांबरे, अशोक शिरगांवकर, राजेंद्र पाटील, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
समितींकडून सूचना, शिफारसी प्राप्त व्हाव्यात
शासननिर्णयानुसार रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या आढाव्यासाठी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या दोन्ही समित्यांचे कार्य पूर्ण झालेले नाही. या समित्यांकडून कुठल्याही शिफारशी व सूचना प्राप्त होण्याआधीच घाईगडबडीने पुनर्रचित अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करणे अयोग्य असल्याचे शिष्टमंडळाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सोनावणे यांना सांगितले.