लोकसभेला सतेज पाटील यांची मदत नाहीच
By Admin | Updated: October 3, 2014 00:33 IST2014-10-03T00:09:30+5:302014-10-03T00:33:39+5:30
धनंजय महाडिक यांचा गौप्यस्फोट : आता भाजपच्या प्रचारात राष्ट्रवादीचे खासदार सक्रिय

लोकसभेला सतेज पाटील यांची मदत नाहीच
कोल्हापूर : कोण म्हणते, काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची मला लोकसभा निवडणुकीत मदत झाली..? ती झाली असती तर आमचे दोन्ही गट एकत्र असूनही मग दोन-तीन हजारांचेच मताधिक्य का मिळाले असते, अशी थेट विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज, गुरुवारी केली. भाजपचे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) संचालक व कर्मचाऱ्यांची बैठक दुपारी विकासवाडी (ता. करवीर) येथील बिमॅट या महाडिक यांच्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी ही विचारणा केली. या बैठकीत अमल महाडिक यांना विजयी करण्याचे आवाहन करून खासदार महाडिक हे भाजपच्या प्रचारात आजपासून उघडपणे सक्रिय झाले.
या बैठकीस अध्यक्ष दिलीप पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास नारायण पाटील, रणजित पाटील, अरुण डोंगळे व रवींद्र आपटे यांच्यासह सुमारे दोनशेंहून अधिक कर्मचारी उपस्थित होते. दुपारी बारा ते दीडच्या सुमारास ही बैठक झाली. त्यास उमेदवार अमल महाडिक व आमदार महादेवराव महाडिक उपस्थित नव्हते. बैठकीच्या शेवटी खासदार महाडिक यांचे भाषण झाले.
खासदार महाडिक म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत आपली मदत झाल्याचे सतेज पाटील यांच्याकडून सांगितले जाते, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. दक्षिणमध्ये त्यांचा व आमचा असे दोनच गट आहेत. ते दोन्ही एकत्र झाले असतानाही या मतदारसंघाशी काहीच संबंध नसलेल्या व वडिलांच्या पुण्याईवर निवडणुकीत उतरलेल्या मंडलिक यांना इतकी मते कशी मिळतात, हेच मला समजले नाही. दोन्ही गटांची मनापासून मदत झाली असती तर कोल्हापूर दक्षिणमधील माझे मताधिक्य वाढायला हवे होते, परंतु तसे घडलेले नाही. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगले प्रयत्न केले, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.’
महाडिक म्हणाले, ‘आमदार महाडिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर नेहमीच वर्चस्व ठेवले, परंतु राजकारणाचा फायदा कधी स्वत:च्या कुटुंबासाठी केला नाही. त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदे दिली, परंतु जेव्हा त्यांच्या मुलग्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याची वेळ आली, तेव्हा मात्र राज्यकर्त्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे महाडिकांना त्याचा राग येणे स्वाभाविक आहे. त्या रागातूनच महाडिक गट या मैदानात उतरला आहे.’
अरुण नरके म्हणाले, ‘करवीर मतदारसंघातून माझा पुतण्या उभा राहिला आहे, परंतु त्याचा प्रचार सोडून मी महाडिकांच्या प्रेमापोटी या बैठकीस आलो आहे. माझा कोणताही पक्ष नाही. मी व्यक्तिनिष्ठ माणूस आहे. ‘गोकुळ’ची भरभराट आमदार महाडिक यांच्यामुळेच झाली आहे. संघाच्या निवडणुकीतही आपल्या सगळ्यांनाच महाडिकांची मदत होते. त्यामुळे आता अमल यांच्या विजयासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया.’
विश्वास पाटील म्हणाले, ‘मी करवीर मतदारसंघात ‘हाता’बरोबर आहे, परंतु दक्षिण मतदारसंघात मात्र ‘कमळा’चे काम करणार आहे.’
अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, ‘मी सुरुवातीपासूनच महाडिकप्रेमी आहे. त्यामुळे अमल महाडिक यांना विजयी करण्यासाठी मी प्रयत्न करीन.’
रणजित पाटील म्हणाले, ‘संघामध्ये आम्ही सर्वजण आमदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करतो. संघातील सत्तारूढ आघाडीचे ते नेते आहेत. लोकसभेला आपण सगळ्यांनी ‘गोकुळ’चा खासदार केला, आता अमल यांना ‘गोकुळ’चा आमदार करूया.’
यावेळी रवींद्र आपटे, अरुण डोंगळे यांचेही भाषण झाले. या दोघांनीही महाडिक यांच्या ‘गोकुळ’ला असलेल्या सहकार्याची आठवण करून दिली.
‘गोकुळ’चा आमदार करणार..
या बैठकीत कोणत्याच संचालकाने सतेज पाटील यांचे नावही घेतले नाही, परंतु उपस्थित सहाही संचालकांनी दक्षिण मतदारसंघात अमल यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. खासदार महाडिक हे ‘गोकुळ’चे खासदार आहेत. त्यांना ‘गोकुळ’ने खासदार केले आहे. आता अमल यांनाही ‘गोकुळ’चे आमदार करूया, असे आवाहन करण्यात आले.
डोंगळे राष्ट्रवादीबरोबर..
राधानगरी मतदारसंघातून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे अरुण डोंगळे यांनी या बैठकीत सांगितले.