कौलवमध्येही गर्भलिंग चाचणीचा संशय
By Admin | Updated: July 5, 2015 01:19 IST2015-07-05T01:19:11+5:302015-07-05T01:19:11+5:30
पोलिसांनी केली चौकशी : ‘भोगावती’तील डॉक्टर गायब

कौलवमध्येही गर्भलिंग चाचणीचा संशय
कोल्हापूर : कौलव (ता. राधानगरी) येथे एका छोट्या खोलीत गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे गर्भलिंग चाचणी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. तसा निनावी फोन पोलिसांना आल्यावर जुना राजवाडा पोलिसांच्या खास पथकाने शनिवारी रात्री तिथे अचानक धाड टाकली; परंतु डॉक्टर तत्पूर्वीच पसार झाल्याचे समजते. रात्री आठच्या सुमारास पोलीसगाडी गावात आल्याने खळबळ उडाली.
हा डॉक्टर भोगावती कारखान्याच्या कॉलनीत राहतो. त्यांच्या नावात ‘दया आणि आनंद’ असला तरी त्याचा व्यवहार मात्र कळ्या खुडण्याचा होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. शिरगावच्या बनावट डॉक्टरला पोलिसांनी अटक केल्यानंतर या डॉक्टरबद्दल गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्याची भीती घेऊन तो गेल्या पंधरा दिवसांपासूनच बेपत्ता असल्याची माहिती गावातूनच मिळाली. गावातील ग्रामपंचायत सदस्याचा तो नातेवाईक आहे. त्यांच्याच घरात पूर्वी त्यांचा दवाखाना होता. आता अलिकडील कांही वर्षात समोरील गाळ््यात दवाखाना सुरु केला आहे. पाहुणे व चालक ‘विक्रम’च्या मदतीने त्याचा हा व्यवहार सुरू होता असे समजते. दवाखान्यासाठी साधी एक खोली, तिथे रुग्णही फारसे कधी दिसत नाहीत; परंतु डॉक्टर मात्र श्रीमंत कसा होत आहे, गाड्या कशा उडवीत आहे, याचेही कोडे लोकांना पडले होते. त्यातूनच मागील काही महिन्यांपूर्वीच कुणीतरी पोलिसांना निनावी फोन केला. पोलिसांनी त्यांना पकडूनही नेले; परंतु ‘लाखा’ची तडजोड झाल्यानंतर सोडून दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणास शिरगावच्या डॉक्टरवरील कारवाईमुळे नव्याने तोंड फुटले आहे..
रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी जिथे या डॉक्टराचा दवाखाना सुरु होता तिथे जाऊन चौकशी केली. घरमालकीण असलेल्या महिलेकडेही प्राथमिक चौकशी केली. त्यांनी हा डॉक्टर फक्त ताप-थंडीच्या गोळ््या देत होता एवढेच सांगितले. आज दवाखाना बंद होता व त्याची किल्ली त्यांच्याकडेच असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष खोलीची पोलिसांना तपासणी करता आली नाही. बहुधा या तक्रारीची आधीच कुणकुण लागल्याने डॉक्टरने पोबारा केल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू होती. (प्रतिनिधी)