स्वातंत्र्याच्या साठीनंतरही विकास नाही
By Admin | Updated: July 15, 2015 21:23 IST2015-07-15T21:23:14+5:302015-07-15T21:23:14+5:30
भाई वैद्य : शेती, औद्योगिक, सहकार या ग्रामविकासाच्या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष

स्वातंत्र्याच्या साठीनंतरही विकास नाही
हुपरी : शेती, औद्योगिक व सहकार ही ग्रामविकासाची खरी त्रिसूत्री असून, ती विकासाची प्रतीके आहेत. मात्र, आतापर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांनी या त्रिसूत्रीकडे विकासात्मक दृष्टीने पाहण्याचे सौजन्यच दाखविले नाही. परिणामी देशाच्या स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही खऱ्या अर्थाने ग्रामविकास झाल्याचे पाहावयास मिळत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी केले.यळगूड (ता. हातकणंगले) येथील श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषिपूरक सेवा संस्थेच्या ४८ व्या वर्धापनदिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थापक सभापती वसंतराव मोहिते अध्यक्षस्थानी होते. अहवाल सालात संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक, गुणवंत विद्यार्थी व संस्थेमध्ये २५ वर्षे सेवाकाल पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.वैद्य म्हणाले, यळगूडसारख्या खेड्यामध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून झालेला विकास पाहून अद्भूत अशा घटनांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी युरोप दौऱ्यावेळी अकरा देशांचा हा अभ्यासदौरा केला. मात्र, यळगूडसारखे विकासात्मक एकही खेडे तेथे पाहावयास मिळाले नाही. संस्थेच्या व्यवस्थापनाने अत्यंत बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करून आरोग्यवर्धक, पौष्टिक पदार्थांची निर्मिती केली आहे. जगामध्ये नामवंत अशा कंपन्यांच्या उत्पादनामध्ये भेसळ आढळून येत आहे. मात्र, येथील उत्पादनामध्ये भेसळीचा साधा लवलेशही आढळत नाही. संस्थेच्या व्यवस्थापनाने जपलेली सचोटी, प्रामाणिकपणा, कर्तव्यता, स्वच्छता, पारदर्शकता पाहिली की ही संस्था म्हणजे कलीयुगातील सतयुगाची आठवण करून देते. असा अद्भूत अनुभव इतरत्र कोठेही पाहावयास मिळत नाही. ग्रामविकासाच्या शेती, औद्योगिक व सहकार या त्रिसूत्रीचा विसर राज्यकर्त्यांना पडल्यामुळे शासनानच्या निर्णयशून्यतेमुळे शेती पाण्याशिवाय कोरडी पडली आहे. औद्योगिकीकरण वाढले, मात्र त्यातून म्हणावा तसा रोजगार उपलब्ध झाला नाही. तसेच ग्रामविकासाचा पाया असणारी सहकार चळवळच मोडीत काढून खिसे भरण्याचे उद्योग सहकार सम्राटांनी सुरू केल्यामुळे सहकार संपुष्टात येत आहे.
वसंतराव मोहिते, विशाखा खैरे, हसन देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. अजितसिंह मोहिते, बाबासाहेब भुयेकर, व्यकाप्पा भोसले, चंद्रकांत बोंद्रे, सदाशिव नाईक, उपसभापती राजगोंडा पाटील, आदी उपस्थित
होते. कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते यांनी स्वागत केले. संचालक भगवान पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)