जादा ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय नाही
By Admin | Updated: November 29, 2015 01:01 IST2015-11-29T00:55:25+5:302015-11-29T01:01:08+5:30
नितीन करीर : सांगलीचा आराखडा लवकरच

जादा ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय नाही
सांगली : राज्यातील १४ ‘ड’ वर्ग महापालिकांना जादा एफएसआय देण्याचा कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, जादा एफएसआयचा (चटई निर्देशांक) निर्णय झाला असता, तर मला त्याची कल्पना असती. असा कोणताही निर्णय झाला नाही. जादा एफएसआय आणि टीडीआरची मागणी प्रस्तावित आहे. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. छोट्या नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगत टीडीआर दिला जाणार नाही. रस्त्यांचे जसजसे रुंदीकरण होईल आणि शहराचा विकास होईल त्याप्रमाणे एफएसआय व टीडीआरबाबत निर्णय घेतला जाईल. सांगलीच्या विकास आराखड्याबाबत ते म्हणाले की, आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सूचना व हरकतींवरील सुनावणी होऊन संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे सादर झालेला आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सांगलीचा विकास आराखडा मंजूर होईल.
समान नियमावलीबाबतची अधिसूचना नगरविकासचे अवर सचिव संजय सावजी यांनी गत आठवड्यात १९ नोव्हेंबर रोजी निर्गमित केली होती. (प्रतिनिधी)