यंदा महाविद्यालयांमध्ये दीक्षांत समारंभ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:11+5:302021-03-26T04:24:11+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ दि. ६ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन स्वरूपात ...

यंदा महाविद्यालयांमध्ये दीक्षांत समारंभ नाही
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ दि. ६ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. त्याला गुरुवारी विद्या परिषदेने मान्यता दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित एकूण २९३ महाविद्यालयांमध्ये यावर्षी दीक्षांत समारंभ घेणे टाळून विद्यापीठातील अधिविभाग आणि या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठविण्याचा निर्णय या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावर्षी पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ७७ हजार ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा समारंभ ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. त्याचे स्वरूप आणि पदवी प्रमाणपत्र वितरणाबाबत विद्या परिषदेची गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हा समारंभ घेण्यास मान्यता देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशानुसार गेल्या दोन वर्षांपासून संलग्नित महाविद्यालयांमध्ये दीक्षांत समारंभ घेण्यात येत आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दक्षता म्हणून विद्यापीठाने महाविद्यालय पातळीवरील दीक्षांत समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पदवी प्रमाणपत्रांसाठी नोंदणी केलेल्या अधिविभाग, संलग्नित महाविद्यालये आणि दूरशिक्षण केंद्रांतील विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे पोस्टाव्दारे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासह हा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्याची शिफारस विद्या परिषदेने केली.
चौकट
चौथ्या दिवशी ३५०९ परीक्षार्थी
दरम्यान, हिवाळी सत्रातील परीक्षांच्या चौथ्या दिवशी गुरुवारी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण ३५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ३४९३ ऑनलाईन परीक्षार्थी होते.