मुलांना आवडीनुसार शिक्षण देण्याची गरज
By Admin | Updated: January 19, 2015 00:33 IST2015-01-18T23:50:06+5:302015-01-19T00:33:14+5:30
देशाच्या प्रशासनामध्ये पुरुष फक्त २० टक्के काम करतात. इतर सगळे महिलांच्या हातात आहे. जी माणसे चुकीचे, स्वार्थाने काम करतात, त्यांची पिढी चुकीची निघते, हा इतिहास आहे

मुलांना आवडीनुसार शिक्षण देण्याची गरज
कोकरुड : विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी शिक्षण घेऊ नये. पालकांनी आपल्या मुलास त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्यावे, तरच पाल्य भविष्य घडवितो. शिक्षकांनी स्वत:च्या मुलाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन दीपस्तंभ फौंडेशन, जळगावचे संस्थापक प्रा. यजुर्वेद महाजन यांनी येथे केले.शिराळा येथली मरिमी चौकात यशवंत युवक संघटना यांच्यावतीने आयोजित यशवंत व्याख्यानमालेत ‘शिक्षण करिअर स्पर्धा परीक्षा’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना प्रा. महाजन बोलत होते.यावेळी प्रा. महाजन म्हणाले की, पालक नोकरी करून जेव्हा घरी येतो, त्यावेळी पाल्यास पहिला शब्द असतो, अभ्यास कर. नातेवाईक, शेजारी-पाजारी घरी आल्यावर अभ्यास कर, असेच सुनावतात, हे आपण पाहतो. हे करू नका. त्यास माहीत असते, अभ्यास कधी करायचा, त्यास सक्ती करू नका. घरात अभ्यासाचे वातावरण तयार करा. पालकांकडून मुलांवर डॉक्टर, इंजिनिअर होण्याचीच सक्ती केली जाते. इतर क्षेत्रातही करिअर करता येते. याविषयी आपल्या मुलास मार्गदर्शन करावे. आर्टस्चे विद्यार्थी सध्या आयएएस, आयपीएस, इतर प्रशासकीयमधील उच्च पदांवर कार्यरत आहेत.
प्रा. महाजन पुढे म्हणाले, देशाच्या प्रशासनामध्ये पुरुष फक्त २० टक्के काम करतात. इतर सगळे महिलांच्या हातात आहे. जी माणसे चुकीचे, स्वार्थाने काम करतात, त्यांची पिढी चुकीची निघते, हा इतिहास आहे. युवकांनी करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रथम मोबाईल, लॅपटॉप याचा आहारी जाण्याचे टाळावे, अन्यथा त्याचे जीवन करपून जाईल, यासाठी वाङ्मयाचे वाचन करा, तुमचे जीवन समृध्द होईल.
युवक संघटनेचे मार्गदर्शक, जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी प्रास्ताविक केले. स्वागत शहाजी पाटील व संजय घोडे-पाटील यांनी केले. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, सौ. सुनंदा नाईक, सौ. राजेश्वरी नाईक, अभिजित नाईक, सुखदेव पाटील, बी. सी. पाटील, अॅड. संजय नाईक, संग्राम पवार, प्रताप पाटील, महेश पाटील, उत्तम निकम, वसंत पाटील, परिसरातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
यशवंत व्याख्यानमाला
पुष्प दुसरे