शासकीय विश्रामगृहासाठी पाठपुरावा करण्याची गरज
By Admin | Updated: July 7, 2015 21:12 IST2015-07-07T21:12:36+5:302015-07-07T21:12:36+5:30
जयसिंगपूर शहर : लोकप्रतिनिधींबरोबर शासकीय यंत्रणेची उदासीनता

शासकीय विश्रामगृहासाठी पाठपुरावा करण्याची गरज
संदीप बावचे- जयसिंगपूर -जिल्ह्याच्या पूर्वभागातील मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयसिंगपुरात शासकीय विश्रामगृह होणे गरजेची बाब बनली आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील मध्यवर्ती केंद्र असलेल्या या शहरात शासकीय विश्रामगृहाची सुविधा अनेक वर्षांपासून केवळ चर्चा म्हणूनच राहिली आहे. लोकप्रतिनिधींची मागणी आणि शासकीयपातळीवरील ठोस पाठपुरावा झाला तरच हे विश्रामगृह अस्तित्वात येणार आहे.आखीव-रेखीव म्हणून जयसिंगपूर शहराची ओळख आहे. शाहू महाराजांनी आपले जनक पिता जयसिंग महाराज यांच्या नावाने व्यापारपेठ म्हणून वसवलेले शहर आज मॉडेल शहर म्हणून नावारूपास येत आहे. सांगली - कोल्हापूर महामार्गावरील केंद्र असलेल्या या शहरात शासकीय विश्रामगृहाची गरज बनू पाहत आहे. तालुक्यात शिरोळ येथे शासकीय विश्रामगृह आहे. या ठिकाणी मर्यादा येत आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी हे विश्रामगृह गरजेचे आहेच; पण जयसिंगपुरातदेखील विश्रामगृह तितकेच महत्त्वाचे आहे. कुरुंदवाड याठिकाणी असलेले विश्रामगृह बंद अवस्थेत आहे.
जयसिंगपूर शहरात बहुतांश शासकीय कार्यालये आहेत. न्यायालये, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, रेल्वेस्थानक, सहायक निबंधक कार्यालय, आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक पंढरी म्हणून जयसिंगपूरची प्रामुख्याने ओळख आहे. यापूर्वी विश्रामगृह होण्याबाबत मागणी झाली होती, त्यानुसार रेल्वेस्थानकाजवळील
जागा आरक्षितही करण्यात आली होती. मात्र, पाठपुरावा झाला नसल्यामुळे ही मागणी अस्तित्वात आली नाही. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील केंद्र असलेल्या या शहरात विश्रामगृहाची गरज भासू लागली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागातील या मोठ्या शहरात विश्रामगृह होण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर शासकीय यंत्रणेच्या पाठपुराव्याची गरज आहे.
खासगी ठिकाणी सोय
तालुक्यामध्ये सर्व शासकीय कार्यालये व उच्च महाविद्यालये आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे प्रशासकीय व शैक्षणिक अधिकारी येत असतात. शिरोळ येथे मर्यादित विश्रामगृह असल्यामुळे नाइलाजास्तव खासगी ठिकाणी राहण्याची सोय करावी लागते.
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर हे सांगली-कोल्हापूर मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी आहे. याठिकाणी विश्रामगृहाच्या आरक्षित जागेबाबत माहिती घेऊन शासकीय विश्रामगृह होण्याबाबत प्रस्ताव ठेवून पाठपुरावा करू.
- उल्हास पाटील, आमदार