बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:22 IST2021-03-21T04:22:26+5:302021-03-21T04:22:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार करीत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेनेतर्फे शनिवारी छत्रपती शिवाजी ...

There must be a united Maharashtra with Belgaum-Nipani | बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार करीत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेनेतर्फे शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यात बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी केले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील कन्नड व्यावसायिकांनी दिवसभर व्यवसाय बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला.

या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत कर्नाटक सरकारच्या या अन्यायाविरोधात जोरदार निदर्शने केली. संजय पवार म्हणाले, सीमा भागातील बांधवांवर मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारची ही एकाधिकारशाही आम्ही मोडून काढू. कर्नाटक सरकारविरोधात शनिवारी कानडी व्यावसायिकांनी केलेल्या लाक्षणिक बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला. बेळगाव महापालिका चौकातील ध्वज त्वरित खाली उतरावा, अशी मागणी केली.

विजय देवणे म्हणाले, कर्नाटक सरकार लोकशाहीविरोधी काम करीत आहे. बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आहे. आचारसंहिता असताना बेळगाव पालिकेसमोरील कन्नड रक्षण वेदिकेच्या पिवळा-लाल ध्वज काढणे अपेक्षित होते. मात्र, तो जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. याला विरोध म्हणून शिवसेना सीमा भागात भगव्या ध्वजाचे पूजन करणार आहे. हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, मंजित माने, चैतन्य अष्टेकर, अभिजित बुकशेट, राजू यादव, शांताराम पाटील, भगवान कदम, शिवाजी जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, नीता पडळकर, गीतांजली गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो २००३२०२१-को ल- शिवसेना०१

ओळ : सीमा भागातील मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेच्या वतीने शनिवारी निदर्शने करण्यात आली.

छाया आदित्य वेल्हाळ

Web Title: There must be a united Maharashtra with Belgaum-Nipani