आलासमध्ये बहुरंगी लढतीचे वातावरण

By Admin | Updated: December 29, 2016 00:22 IST2016-12-29T00:22:42+5:302016-12-29T00:22:42+5:30

नेते सक्षम उमेदवारांच्या शोधात : महिला आरक्षणामुळे मातब्बर इच्छुकांचा हिरमोड; कार्यकर्त्यांची पत्नींसाठी तयारी

There is a multi-colored atmosphere in the niche | आलासमध्ये बहुरंगी लढतीचे वातावरण

आलासमध्ये बहुरंगी लढतीचे वातावरण

अजित चंपुणावर-- बुबनाळ -आलास जिल्हा परिषद मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी आरक्षित झाल्याने इच्छुक मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. आलास पंचायत समिती सर्वसाधारण महिला, तर गणेशवाडी पंचायत समिती सर्वसाधारण जागेसाठी खुला झाला आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व असल्यामुळे स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यामध्ये बहुरंगी लढत होणार आहे.
कर्नाटक सीमाभागालगत वसलेला शिरोळ तालुक्यातील ४३ हजार ३९५ लोकसंख्या असलेला आलास जिल्हा परिषद मतदारसंघात यापूर्वी आठ गावांचा समावेश होता. मतदारसंघ पुनर्ररचनेत शिरटी व बस्तवाड या दोन गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
आलास मतदारसंघात २००२च्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार निवेदिता माने यांचे समर्थक दिवंगत शौकत पटेल यांनी नेतृत्व केले. धैर्यशील माने यांनी राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा येथू करीत २००७ ची निवडणूक जिंकत पुढे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषविले. दरम्यान, २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. यामध्ये सा.रे. पाटील गटाच्या अर्चना अनंत धनवडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. या निवड प्रक्रियेत खासदार माने गटाला वगळण्यात आले होते. त्याचा फटका त्यांना बसला. खासदार माने गटाने गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या शिरोळ तालुका विकास आघाडीला अप्रत्यक्षरित्या बळ दिले. या आघाडीतर्फे जिल्हा परिषदेला पाशाजादी साहेबपाशा पटेल यांना तसेच आलास पंचायत समितीसाठी अभिजित जगदाळे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत स्वाभिमानीच्या सुनंदा अजित दानोळे निवडून आल्या. तर आलास पंचायत समितीसाठी अफसर पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी स्वाभिमानीने नवख्या कमरोद्दीन पटेल यांना उमेदवारी दिली. स्वाभिमानीच्या लाटेत पहिल्याच प्रयत्नात पटेल निवडून आले.
आलास मतदारसंघ नागरिकांचा मागासवर्ग महिला जागेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे सध्यातरी मतदारसंघात शांतता असून, नेते मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात आहेत. सध्या या मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असून, संघटना स्वबळावर लढणार आहे. संघटनेकडून जिल्हा परिषदेसाठी बुबनाळ ग्रामपंचायत सदस्य रोशनबी बैरगदार, कवठेगुलंदच्या सलमा वाळवेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर औरवाडचे उपसरपंच दादेपाशा पटेल यांच्या पत्नी परवीन पटेल यांचे नाव राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीकडून चर्चेत आहे. याबरोबर उल्फतबी मकानदार, आसमा जमादार, शमशाद झाकीर शिकलगार यांची नावेही चर्चेत आहेत.
आलास पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महावीर मगदूम यांच्या पत्नी रूपाली मगदूम, गौतम किणिंगे यांच्या पत्नी अश्विनी किणिंगे, औरवाडच्या माहेनूर रफ्युद्दीन पटेल यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शशिकला किणिंगे, दादामियाँ पठाण यांच्या पत्नी सायरा पठाण, आबिद पटेल यांच्या पत्नी सुमैय्या पटेल यांची नावे चर्चेत आहेत. बहुजन विकास आघाडीतर्फे अपर्णा अमोल हिंगणगावे हे इच्छुक आहेत.


स्वभिमानीची ताकद
सीमाभागालगत असलेला आलास मतदारसंघात सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा परिषद सदस्य सुनंदा दानोळे, गणेशवाडी पंचायत समिती सदस्य वैशाली देवताळे, आलास पंचायत समितीचे सदस्य कमरोद्दीन पटेल यांच्यासह अजित दानोळे, मन्सुर मखमल्ला, रजनीकांत मरजे, बापुसो ऐनापूरे, शमशोद्दीन पटेल, नारायण वास्कर, अशोक देवताळे, अमृत आणुजे, गौतम किणिंगे ही स्वाभिमानी संघटनेची ताकद आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्तीस्थळे
माजी पंचायत समिती सदस्य अर्चना धनवडे, ‘जवाहर’चे संचालक सुकुमार किणिंगे, नासर पठाण, बापूसो बोरगावे, सुरेश शहापूरे, आशरफ पटेल, विजय कुंभोजे, आनंदा कुम्मे, मल्लाप्पा चौगुले, अनंत धनवडे, दादासो देवताळे, विजयकुमार गाताडे, बशीर पटेल, शरद कारखान्याचे धनपाल मरजे, धनाजीराव जगदाळे, फजलेअली पटेल, असलम मखमल्ला, अफसर पटेल, सईद पटेल, अनिरुद्ध राजमाने यांच्यासह कार्यकर्ते काँग्रेसची शक्तीस्थळे आहेत. काँग्रेसला मानणारा मतदार, कार्यकर्ते, गट या मतदारसंघात कार्यरत आहे.

Web Title: There is a multi-colored atmosphere in the niche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.