भाजप-काँग्रेसमध्ये दुरंगी लढत

By Admin | Updated: November 10, 2016 00:14 IST2016-11-09T23:57:37+5:302016-11-10T00:14:41+5:30

इचलकरंजीत शिवसेना स्वबळावर : उमेदवारांकडून घरोघरी प्रचारावर भर; पुढील आठवड्यापासून रणधुमाळी

There is a long-drawn battle between the BJP and the Congress | भाजप-काँग्रेसमध्ये दुरंगी लढत

भाजप-काँग्रेसमध्ये दुरंगी लढत

राजाराम पाटील -- इचलकरंजी -येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी विरुद्ध दोन्ही कॉँग्रेसची युती, अशी दुरंगी लढत होत असली तरी सर्वच उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार हेच तंत्र वापरात आणले आहे. त्यामुळे सध्या तरी शांतता असली तरी उमेदवारी अर्ज माघारीनंतर पुढील आठवड्यापासून निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यात भाजप व शिवसेनेची युती असूनसुद्धा शिवसेनेने मात्र इचलकरंजीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरिता सुमारे दोन लाख १५ हजार मतदारांना मतदान करावे लागणार असल्याने येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध कॉँग्रेस अशी लढत होत आहे, तर नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे. अशा परिस्थितीमध्ये कॉँग्रेसची राष्ट्रवादीबरोबर आघाडी असून, भाजपची ताराराणी आघाडीबरोबर युती आहे. राष्ट्रवादीमध्ये जांभळे गट व कारंडे गट हे दोन्ही गट आपापल्या जागा वाटून घेऊन स्वतंत्रपणे लढत आहेत. त्याचप्रमाणे ताराराणी आघाडीमध्ये पूर्वाश्रमीची शहर विकास आघाडी, मॅँचेस्टर आघाडी आणि शिवसेना असे घटक पक्ष आहेत.
ऐन दिवाळी सणामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरीसुद्धा प्रमुख पक्ष व आघाड्यांमध्ये युती करण्याविषयी अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (म्हणजे २९ आॅक्टोबरपर्यंत) चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहिले होते. दिवाळी सण संपताच बहुतांश उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी-गाठी घेणे आणि आपल्याला मतदान देण्याबाबत विनवणी सुरू केली आहे. वास्तविक, पाहता भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी असे मोठे पक्ष या निवडणुकीत उतरल्यामुळे आतापर्यंत प्रचाराला गती येणे अपेक्षित होते; पण निवडणूक अवघ्या १६-१७ दिवसांवर असताना सुद्धा निवडणूक प्रचार यंत्रणा मात्र घरोघरी जाऊन भेटी-गाठी घेणे याच स्तरावर रेंगाळली आहे.
राज्य पातळीवर भाजप आणि शिवसेना ही युती सत्तेत आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमधील पहिल्या टप्प्यात शिवसेनेने ‘अकेला चलो रे’चा नारा दिला आणि त्यानंतर अवघ्या चारच दिवसांनंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिला असताना युती अबाधित असल्याचा वरिष्ठांकडून निरोप आला. या गोंधळात शिवसेनेला भाजपबरोबर युती करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला.
या कमी वेळात स्थानिक पातळीवर बोलणी फिसकटली आणि इचलकरंजीत मात्र शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. सध्या नगरपालिकेकडील नगरसेवक पदासाठी २६ उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवार शिवसेनेने उभा केला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली.

युतीची चर्चा फिस्कटली : स्वबळावर लढण्याचा निर्णय
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात भाजपबरोबर युती करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून निरोप आल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, महादेव गौड, धनाजी मोरे यांनी भाजपचे येथील आमदार सुरेश हाळवणकर यांच्याबरोबर जागा वाटपाची बोलणी केली. पण शिवसेनेला फक्त चार जागा सोडण्यात येतील, असे सांगण्यात आल्यामुळे चर्चा फिस्कटली.
त्यामुळे हा निर्णय शिवसेनेच्या वरिष्ठांकडे कळविला आणि वरिष्ठांच्याच आदेशानुसार इचलकरंजीमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवित आहोत, असेही जिल्हाप्रमुख जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रक्रियेत सयाजी चव्हाण, उमा गौड व संगीता आलासे यांनी ताराराणी आघाडीबरोबर जुळवून घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला आहे; पण संगीता आलासे यांचे पती राजू आलासे यांना मात्र पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: There is a long-drawn battle between the BJP and the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.