कागलचे स्वराज्य निर्माण करण्याची घाई आहे --समरजितसिंह घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:31 IST2018-02-02T20:30:08+5:302018-02-02T20:31:34+5:30
सेनापती कापशी : मला राजकारणात यायची फार घाई आहे. आमदार मुश्रीफसाहेबांचा माझ्यावर एक आरोप आहे. आरोप-प्रत्यारोप बरेच सुरू आहेत.

कागलचे स्वराज्य निर्माण करण्याची घाई आहे --समरजितसिंह घाटगे
सेनापती कापशी : मला राजकारणात यायची फार घाई आहे. आमदार मुश्रीफसाहेबांचा माझ्यावर एक आरोप आहे. आरोप-प्रत्यारोप बरेच सुरू आहेत. पण मी सांगू इच्छितो होय मला घाई आहे ती कागलच्या राजकारणातून नकारात्मक राजकारणाला बाहेर काढण्याची घाई आहे. कागल मतदारसंघाला पद देण्याची घाई आहे आणि सर्वात शेवटी मला आमदार होण्याची घाई नाही तर स्व. मंडलिकसाहेब व राजे विक्रमसिंह घाटगेंच्या मावळ्यांना सोबत घेऊन कागलचे स्वराज्य निर्माण करण्याची घाई आहे, असे प्रतिपादन म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
ते आलाबाद (ता. कागल) येथे शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश कार्यक्रमात बोलत होते. खासदार मंडलिकसाहेबांनी स्वत:ला खासदार करा असे कधी म्हंटले नाही ते नेहमी कागलच्या जनतेला खासदार करा असे म्हणायचे. त्याचप्रमाणे कागलच्या जनतेला आमदार करायची वेळ आली आहे. याकरिता स्व. राजे विक्रमसिंह व मंडलिकसाहेबांच्या मावळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकदा होऊन जाऊ द्या कुरूक्षेत्र मलाही बघायचे आहे की, तुमचं नकारात्मक राजकारण जिंकते की कागलच्या स्वाभिमानी जनतेचं स्वराज्य असे म्हणून समरजितसिंह घाटगेंनी आमदार हसन मुश्रीफांना थेट आव्हान दिले.
शिवसेनेकडून सातत्याने अन्याय करून खच्चीकरण केले. त्यांच्या कारभाराला कंटाळून कोणताही स्वार्थ न ठेवता राजे समरजितसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली आम्ही युवक भाजपात प्रवेश करत आहोत, असे शिवसेनेचे वैभव पाटील म्हणाले.
अशोक सातुसे, श्रावण कामते, दिलीप तिप्पे, सागर मोहिते, आर. डी. चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आलाबाद, हसूर खुर्द, तमनाकवाडा, मांगनूर, मुगळी आदी गावांतील चिकोत्रा खोºयातील १०८ युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मोटारसायकल रॅली काढून संपूर्ण चिकोत्रा परिसरात शक्तीप्रदर्शन केले. समरजितसिंह घाटगे स्वत: या रॅलीत मोटारसायकल घेऊन सामील झाले.
यावेळी संजय गांधी समितीचे उमेश देसाई, युवा नेते राजाभाऊ माळी, अमरसिंह घोरपडे, आयुबखान इनामदार, सचिन चेचर, संजय बरकाळे, धनाजी खराडे, सुनील पसारे, कर्नल शिवाजी बाबर, मनोहर कामते, माजी सरपंच मायावती कामते, रंगराव मेतके, शितल उत्तुरे, सागर करडे आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
१९ तारखेला शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार
कागल तालुक्यातील अनेक तरुण मंडळांनी मला भेटून शिवजयंती एकत्र साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार तालुक्यातून मोठ्या प्रमाणात तरुणांनी कागल शहरामध्ये एकत्र येण्याचे निमंत्रण देत आहे. शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करून कोल्हापूर जिल्ह्यासह शिवजयंतीचे आदर्श उदाहरण देऊ असे समरजितसिंह घाटगे म्हणाले.
आलाबाद (ता. कागल) येथे चिकोत्रा खोºयातील युवा कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.