कोविड लस घेतल्यानंतर एकही पॉझिटिव्ह नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:21+5:302021-02-16T04:24:21+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोविड लसीकरणामुळे काही मोजक्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली; परंतु अशा सौम्य लक्षणामुळे घाबरुन जाण्याचे अजिबात ...

कोविड लस घेतल्यानंतर एकही पॉझिटिव्ह नाही
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोविड लसीकरणामुळे काही मोजक्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली; परंतु अशा सौम्य लक्षणामुळे घाबरुन जाण्याचे अजिबात कारण नाही कारण ती अपेक्षितच आहेत, असा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. जिल्ह्यात लसीकरणास फारशी गती मिळाली नसली तरीही ६२ टक्क्यापर्यंत उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लस घेतल्यानंतर नव्याने पॉझिटिव्ह आलेला एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
कोविड प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर ती सर्वांत आधी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना टोचण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ‘फ्रंटलाईन’वर काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येत आहे. दि. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाली आणि विशेष म्हणजे एक महिन्यात ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या कोविडचा प्रभाव अतिशय कमी झाल्यामुळे आणि त्याच्या संसर्गाची भीती नसल्यामुळे आता ‘कशाला टोचून घ्यायची लस’ही मानसिकता उद्दिष्ट पूर्ण होण्यातील प्रमुख अडचण आहे.
आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जात असली तरी त्याबाबत सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळेही अपेक्षित उद्दिष्ट प्रशासनाला गाठता आलेेले नाही. लसीचे दोन डोस टोचून घेतल्यानंतर चौदा दिवसांनी संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कोरोना होण्याची शक्यता टळते. लस टोचून घेतल्यानंतर कसलेही पथ्यपाणी नाही, तुम्ही नेहमीप्रमाणे खाणंपिणं ठेवू शकता, प्रवास करू शकता.
लस टोचून घेणाऱ्यांपैकी काही मोजक्या लोकांना सौम्य लक्षणे दिसून आली. किरकोळ ताप, कणकण, अशक्तपणा येणे अशी लक्षणे एक-दोन दिवस दिसून आली; परंतु ती सौम्य असल्याने घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
विभाग लसीकरणाची केंद्रे लसीकरणाचे उद्दिष्ट लस टोचलेेल्या व्यक्ती टक्केवारी
ग्रामीण - १८ केंद्र- २२ हजार ९८५ १४ हजार ९६५ ६५ टक्के
शहर - ११ केंद्रे १३ हजार ००० ०७ हजार ३३४ ५६ टक्के
एकूण - २९ केंद्रे ३५ हजार ९६५ २२ हजार २९९ ६२ टक्के
खबरदारी घेणे तरीही आवश्यक-
कोविड लस टोचून घेतली तर ती संबंधित व्यक्ती लस टोचून घेतल्याच्या क्षणापासून सर्वसामान्य दिनक्रम सुरू ठेवू शकते; परंतु पुढे काही दिवस नाकाला मास्क, शारीरिक अंतर राखणे या गोष्टी पाळाव्या लागणार आहे.