जिल्हा रूग्णालयात एकही रूग्ण नाही
By Admin | Updated: November 11, 2014 23:20 IST2014-11-11T22:09:22+5:302014-11-11T23:20:09+5:30
डेंग्यूची साथ : आरोग्य विभागास सर्व्हेचे आदेश

जिल्हा रूग्णालयात एकही रूग्ण नाही
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते आॅक्टोबर अखेर विविध प्रकारातील तापाचे २ लाख २२ हजार रुग्ण आढळले असून त्यात डेंग्यू ३९, लेप्टो २ तर हिवतापाचे १२१ रुग्ण आहेत. तसेच सध्या सिंधुदुर्गात डेंग्यू साथीचा फैलाव होत असला तरी जिल्हा रुग्णालयात मात्र डेंग्यूने त्रस्त एकही रुग्ण उपचार घेत नसल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यभरात साथ आहे. राज्यात ठिकठिकाणी या तापाने मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी असून सिंधुदुर्गात सुदैवाने मात्र अशी स्थिती नाही. असे असले तरी हिवताप विभागाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना आखताना दिसून येत नाही. आरोग्य संचालक सतीश पवार यांनी आरोग्य विभागास जिल्ह्यात सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गृहभेट देण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत.
असे असले तरी प्रत्यक्षात कृती करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागात पोचणे आवश्यक आहे. तरच ही डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागास यश येईल.
दहा महिन्यात तापाचे आढळले सव्वा दोन लाख रुग्ण
जानेवारी ते आॅक्टोबर अखेर तापाचे २ लाख २२ हजार एवढे रुग्ण आढळले होते. त्यातील लेप्टोसाठी ३ हजार ४४१ रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी दोन रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच डेंग्यूची चाचणी करण्यासाठी ३ हजार ८८४ रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते.
त्यापैकी ३९ रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले. तसेच हिवतापाचे १२१ रुग्ण आढळले होते. यातील सर्व रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून या साथीने कोणाचाही मृत्यू झालेला नाही असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
तापाचे ४१ रुग्ण उपचाराखाली
जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत तापाचे ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण साध्या तापाचे असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे जिल्हा रुग्णालयाचे चिकित्सक डॉ. आर. डी. माने यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)