कागल नगरपालिकेत आता वीस नगरसेवक

By Admin | Updated: March 19, 2016 00:14 IST2016-03-19T00:09:42+5:302016-03-19T00:14:32+5:30

निवडणूक आठ महिन्यांवर : लोकसंख्या, हद्दवाढ या घटकांचा विचार करून संख्या वाढविली

There are 20 councilors in the city of Kagal now | कागल नगरपालिकेत आता वीस नगरसेवक

कागल नगरपालिकेत आता वीस नगरसेवक

जहाँगीर शेख -- कागल  नगरपरिषदेची निवडणूक सात-आठ महिन्यांवर आली आहे. प्रशासनाकडून या निवडणुकीची तयारी झाली आहे. वाढलेली लोकसंख्या आणि हद्दवाढ या घटकांचा विचार करून प्रशासनाने १७ ऐवजी २0 नगरसेवक संख्या करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे. त्यामुळे सभागृहात तीन नगरसेवक जादा दिसणार आहेत.
साधारणत: २४ हजार लोकसंख्येच्या अनुषंगाने १७ नगरसेवक संख्या निश्चित झाली होती. आता ही लोकसंख्या ३५ हजारांच्या पुढे गेली आहे. २00९ मध्ये कागल नगरपरिषदेची हद्दवाढ होऊन पालिका हद्दीचा विस्तार झाला. त्याचप्रमाणे तेथील लोकसंख्याही नगरपालिका हद्दीत आली आहे. गेल्या १0 वर्षांत वसाहतीबरोबरच शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या नगरपालिकेत १७ नगरसेवक शहराचे प्रतिनिधित्व करतात. ११ डिसेंबर २0१६ पूर्वी नवीन नगराध्यक्ष निवड होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नोव्हेंबर २0१६ मध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारयादी पुनर्रचनेबरोबरच नगरसेवकांची संख्या निश्चित करून त्यानंतर प्रभाग रचना आरक्षण सोडत होणार आहे. गतनिवडणुकीत या प्रभागातून तीन आणि चार या प्रमाणात नगरसेवक निवडून दिले होते. यावेळी हा पॅटर्न बदलून एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना करण्याचा विचार शासन करीत आहे. त्यामुळे मतदारांवर व्यक्तिगत प्रभाव हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. १९ ते २0 नगरसेवक संख्या निश्चित झाल्यानंतर मग प्रभाग रचना करताना पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे. कारण कागल शहराच्या हद्दवाढीत लिंगनूर दुमाला, पिंपळगाव खुर्द, व्हन्नूर, मौ. सांगाव, क. सांगाव या गावांच्या हद्दीपर्यंत नगरपालिका हद्द पोहोचली आहे. या ठिकाणच्या छोट्या वस्त्या, उपनगरे यांना प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे तर राजकीय गटांनाही कार्यकर्ते सांभाळताना १७ ही लोकसंख्या अपुरी पडत होती. दोन जागा वाढल्या तर तेवढीच सोय करता येणार आहे. शासनाकडून दोन की तीन जागा वाढवून येणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

पडद्यामागून राजकीय हालचाली
नगरपालिका निवडणुकीसाठी सात ते आठ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय गट सावध हालचाली करीत आहेत, मात्र या हालचाली पडद्यामागील आहेत.
प्रामुख्याने सत्ताधारी आमदार हसन मुश्रीफ गट आणि समरजितसिंह घाटगे यांचे ‘राजे गट’ यांच्याकडून या हालचाली सुरू आहेत. तर मंडलिक गट, संजय घाटगे गट या दोन्ही गटांकडे लक्ष ठेवून आहेत.

Web Title: There are 20 councilors in the city of Kagal now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.