पुण्याहून सातारला येताना अजून एक बोगदा हवा
By Admin | Updated: July 29, 2014 23:02 IST2014-07-29T21:25:48+5:302014-07-29T23:02:16+5:30
नितीन गडकरींकडे उदयनराजेंची मागणी

पुण्याहून सातारला येताना अजून एक बोगदा हवा
सातारा : पुणे ते सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे कामास अवास्तव विलंब होत आहे, रस्त्याची कामे प्रमाणित नमुन्यापेक्षा हलक्या दर्जाची होत आहेत. त्यामुळे पुणे-सातारा या महामार्गावरील प्रवासाचा प्रवाशांना वीट आला आहे. या कामात युद्धपातळीवर सुधारणा होण्याची कडक उपाययोजना करावी. खंबाटकी घाटात पुण्यावरून येताना आणखी एक बोगदा नव्याने बांधण्यात यावा, या मागण्यांसह मुंबई-बेंगलोर कॉरिडॉर होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील कामांसाठी नागरिकांतून उद्रेक होण्याची वाट महामार्ग प्राधिकरण पाहत आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी अपेक्षावजा मागण्या केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या.उदयनराजे यांनी महामार्गाच्या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे उदयनराजे भत्तेसले यांच्या समवेत गडकरी यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी उदयनराजे यांनी महामार्गाच्या दुरवस्थेबाबत खेद व्यक्त करीत या कामांचे वाभाडे काढले. बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे चेअरमन आर. पी. सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे महाराष्ट्र प्रकल्पांचे प्रमुख सुधीरकुमार, अशोकराव सावंत हे उपस्थित होते.
खासदार उदयनराजे यांनी मंत्री गडकरींना वस्तुस्थिती निदर्शनास आणून देताना उदयनराजे म्हणाले, महामार्गावर सुरू असलेली कामे हीन दर्जाची होत आहेत. कामे सुरू असल्याबाबत कोठेही दिशादर्शक किंवा सावधानतेचे फलक नाहीत. सहापदरीकरणाच्या विलंबाने सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. खंबाटकी घाटामध्ये नवीन बोगद्याची गरज आहे. साताराहून पुण्याला जाताना बोगदा असल्याने, वेळेची व खर्चाची बचत होत आहे. परंतु पुण्याहून सातारकडे येण्यासाठी घाटाचाच रस्ता सुरू आहे. तेथे घाटाऐवजी नवीन बोगदा आवश्यक आहे. त्यामुळे अपघात व वेळ-खर्च वाचणार आहे. याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
-केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नतीन गडकरी यांनी महामार्गाच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच नवीन बोगदा निर्माण करण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणेची बैठक आयोजित केली जाईल. अधिवेशन संपताच १५ दिवसांत ही बैठक आयोजित करून त्या बैठकीतच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन खासदार उदयनराजे यांना दिले