...तर पुष्पहार घालून मिरवणूक काढणार
By Admin | Updated: November 23, 2015 00:28 IST2015-11-22T23:30:22+5:302015-11-23T00:28:02+5:30
प्रज्ञा पोतदार : शौचालययुक्त मोहीम सुरूच; ३४ जणांवर दंडात्मक कारवाई

...तर पुष्पहार घालून मिरवणूक काढणार
इचलकरंजी : शहर पूर्णपणे शौचायलयुक्त होण्याच्या मोहिमेंतर्गत रविवारी ३४ जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आज, सोमवारपासून ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने पुष्पहार घालून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली.
नगरपालिका प्रशासनाने पालिका हद्दीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. उघड्यावर शौच करणाऱ्यांची मिरवणूक काढून त्यांना दंडही केला जातो. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला असून, पे अँड युज शौचालयांना गर्दी वाढू लागली आहे. तसेच वैयक्तिक शौचालयास बांधणीसाठी अनुदान मागणीचे अर्जही पालिकेकडून घेतले जात आहेत.मोहीम राबविताना काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत, तर सार्वजनिक शौचालयांची पडझड झाली असून, काही शौचालयांत व आवारात घाणीचे साम्राज्य आहे, अशा तक्रारीही येऊ लागल्या आहेत. त्या ठिकाणी पाहणी करून ती शौचालये युद्धपातळीवर दुरुस्त केली जातील, असेही अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
यंत्रमाग कारखान्यांकडे कामगारांसाठी--शौचालये असणे अत्यावश्यक
इचलकरंजीतील वस्त्रोद्योगामुळे येथे सुमारे बारा हजार कारखाने आहेत. त्यापैकी बहुतांश कारखान्यांकडे शौचालये नसल्याचे आढळून आले आहे. अशा कारखान्यांतील कामगार रात्री उघड्यावर शौचास बसल्याचे निदर्शनात आले आहे. तरी कारखान्यांकडे ताबडतोब शौचालये बांधून घेण्याविषयी नगरपालिकेच्यावतीने नोटिसा दिल्या जाणार आहेत.
बांधकाम कामगारांनाही शौचालये द्यावीत---शहराच्या हद्दीत अनेक ठिकाणी नवीन इमारतींसाठी बांधकामे सुरू आहेत. त्यांचे कामगार इमारतीजवळच तात्पुरता निवारा करून राहतात. त्यांच्यासाठीही तात्पुरत्या शौचालयाची सोय संबंधित कंत्राटदार किंवा इमारत मालकाने करून द्यावी. यासाठी आज, सोमवारी शहरातील कंत्राटदारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले.