...तर आम्हालाही हातात शस्त्रे घ्यावी लागतील
By Admin | Updated: April 3, 2015 23:56 IST2015-04-03T22:45:56+5:302015-04-03T23:56:51+5:30
कोल्हापुरात ‘भाकप’तर्फे आत्मक्लेश आंदोलन

...तर आम्हालाही हातात शस्त्रे घ्यावी लागतील
कोल्हापूर : ज्येष्ठ परिवर्तनवादी नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून जाणीवपूर्वक भरकटविला जात आहे. खऱ्या खुन्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे; त्यामुळे आत्मक्लेश म्हणून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला. यातून बोध घेऊन खुन्यांचा शोध घ्यावा; अन्यथा पोलीस, शासन यांना लाज वाटेल, असे आंदोलन करू. आता संयम सुटत आहे, प्रसंगी आम्हालाही हातात शस्त्रे घ्यावी लागतील, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शुक्रवारी देण्यात आला. अॅड. पानसरे यांची हत्या होऊन ४६ दिवस होऊन गेले. तर अजूनही मारेकरी मोकाट आहेत. तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे तुणतुणे वाजविले जात आहे. वेळोवेळी अॅड. पानसरे यांनी धर्मांध शक्तींच्या विरोधात जागृती केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी पुस्तक लिहिले. धर्मांध शक्तींच्या दिशेने तपास करणे अपेक्षित आहे; पण तपास जाणीवपूर्वक दिशाहीन केला जात आहे, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)