म्हाकवे : कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वाढीव मतदारसंघाची रचना करताना म्हाकवे गावचा समावेश हा दळणवळणाच्या सुविधा नसणाऱ्या आणि डोंगर, नदी याचा विचार न करता सिद्धनेर्ली मतदारसंघात केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत परिसरातील संलग्न गावे जोडून म्हाकवे हा जि.प. मतदारसंघ बनविण्यात यावा. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू. तसेच प्रशासनाच्या मनमानी धोरणाविरोधात आम्ही कर्नाटकात सहभागी होऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.म्हाकवे येथील हनुमान मंदिरात झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा एकमुखी निर्णय घेतला. यावेळी सर्वच पक्ष, गटांचे प्रमुख उपस्थित होते. बानगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करताना संलग्न असणाऱ्या म्हाकवे गावाला वगळले आहे. तालुक्याचा पहिला सभापती होण्याचा बहुमान मिळालेल्या आणि परिसरातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या या गावाला प्रशासनाने सवतीचीच वागणूक दिली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यावेळी माजी पं.स. सदस्य ए वाय पाटील, माजी जि.प. सदस्य शिवानंद माळी, माजी सरपंच वर्षा पाटील, धनंजय पाटील, रमेश पाटील, उपसरपंच अजित माळी, दिनेश पाटील, जीवन कांबळे, शिवाजी वाडकर, महादेव चौगुले आदी उपस्थित होते.
...तर न्यायालयीन लढाईभौगोलिक संलग्नतेनुसार प्राधान्य न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वर्षा पाटील यांनी, प्रसंगी कर्नाटकात जाण्याचा इशारा शिवानंद माळी यांनी, तर ग्रामस्थांतून प्रशासनाविरोधात लढा उभा करण्याचा निर्धार ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला असून, प्रसंगी न्यायालयीन लढाई करण्याचा निर्धार रमेश पाटील यांनी व्यक्त केला.