‘त्यांच्या’ बोटांनी हिरवाई नटली

By Admin | Updated: December 9, 2014 00:29 IST2014-12-09T00:00:39+5:302014-12-09T00:29:16+5:30

कृषी क्रांतीचे शिलेदार-- व्ही. एन. शिंदे

With their 'fingers' green nets | ‘त्यांच्या’ बोटांनी हिरवाई नटली

‘त्यांच्या’ बोटांनी हिरवाई नटली

‘त्यांच्या’ बोटांनी हिरवाई नटली
कृषी क्रांतीचे शिलेदार
मानवाच्या उत्क्रांतीपासूनची सर्वांत महत्त्वाची गरज होती, ती म्हणजे अन्न. निवाऱ्यासाठी कृत्रिम घरे उभी राहिली. पॉलिमरची वस्त्रे तयार होत आहेत. मात्र, कृत्रिमरीत्या शाकाहारी अन्ननिर्मितीचा उपाय अद्यापपर्यंत शोधला गेलेला नाही आणि भविष्यात याचा शोध लागेल, अशी शक्यताही कमी आहे. मानवाचा मूळ आहार हा शाकाहारच आहे, असे मानवाची शरीररचना अभ्यासणाऱ्या संशोधकांनीही सिद्ध केले आहे. सुरुवातीला लोकसंख्या कमी होती व मोठ्या प्रमाणात जंगले होती. तेव्हा फारसे कष्ट न करताही निसर्गत: वाढलेली फळे, अन्नधान्ये खाऊन जगणे मानवाला शक्य होते; पण लोकसंख्या वाढत गेली आणि जीवनपद्धतीही विकसित होत गेली. मानवाने बुद्धीच्या जोरावर जसजसा विकास केला तसतसे अनेक घटक कार्यरत झाले. मानवाचा विकास हा चौफेर होत होता; पण तो भौतिक सुखांच्या मागे लागून निसर्गाचा ऱ्हास करू लागला. निसर्गाचे संतुलन एकीकडे बिघडत होते, तर दुसरीकडे सिमेंटची जंगले निर्माण होत होती. वाढते आयुर्मान, घटलेला बालमृत्यू दर यांमुळे या प्रगतीसोबत लोकसंख्याही प्रचंड वेगाने वाढत होती आणि आजही काही देशांत वाढते औद्योगिकीकरण प्रदूषणाचे काम करू लागले आणि प्रदूषणपातळी संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक असणारे हिरवे आच्छादन नष्ट होऊ लागले. भूजल पातळी कमी होणे, पाणी प्रदूषित होणे, जलचरांवर त्यांचा अनिष्ट परिणाम या सर्व बाबी वृक्षांच्या संख्येत घट होत असताना दिसू लागल्या.
अशा परिस्थितीचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी, वनराईला अबाधित राखण्यासाठी, अधिक उत्पादन देणारी शेती बनविण्यासाठी, पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी, तसेच मानवी जीवन अधिक सुखकारक करण्यासाठी झटणारे समाजसेवक, संशोधक ही खऱ्या अर्थाने देवमाणसेच म्हणावी लागतील. काळाच्या ओघात वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या कालखंडांत असे अनेक थोर शास्त्रज्ञ झाले, ज्यांनी मानवाची ही प्रथम गरज भागविण्यासाठी आपले आयुष्य वेचले. जेथे-जेथे त्यांची बोटे फिरली तेथील शिवार हिरवेगार झाले. अशा हिरव्या बोटांची आणि मनाची व्यक्तिमत्त्वे समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहोत. कार्व्हर यांच्यासारखं कदाचित त्यांच्याहून खडतर असं आयुष्ये लाभलेली ही व्यक्तिमत्त्वे त्या-त्या परिस्थितीत सर्वोच्च कार्य करीत राहिली. त्यांच्यामुळे अनेकदा अन्नामुळे होऊ घातलेली युद्धे टळली आणि मानवी समाज हा सुसंस्कृत राहिला. कार्ल लिनियससारख्या स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञाने १८व्या शतकात वनस्पतींच्या वर्गीकरणाची पद्धती विकसित केली, तर अलेक्झांडर फॉन हंबोल्ट यांनी वनस्पतीचे विश्व सादर केले. योहान मेंडेल यांनी अनुवंशशास्त्र विकसित करीत संकरित वाणाच्या शास्त्राची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींंना भावना असतात, हे सिद्ध केले. मसानोबू फुकुओका या जपानी संशोधकाने निसर्गशेतीचा पुरस्कार केलाय, तर नॉर्मन बरलॉग यांनी वैश्विक हरितक्रांती आणली. एम. एस. स्वामिनाथन यांनी भारतात हरितक्रांती घडविली. कृषिपूरक उद्योगातून दुग्ध व्यवसायाद्वारा वर्गीस कुरियन यांनी धवलक्रांती घडवून आणली. अशा अनेक व्यक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वावर आज विश्व शांततामय स्थितीत आहे, अशा महापुरुषांना स्मरण्याचा या लेखमालेचा प्रयत्न राहील. या सर्वांचे कर्तृत्व चार-पाचशे शब्दांत सांगणे कठीण आहे; पण त्यांचे स्मरण होणे तितकेच आवश्यक आहे. कारण, इतिहासाचे पान उलगडुनी चरित्र त्यांचे पाहा जरा, त्यांच्यासम आपण व्हावे, हाच सापडे बोध खरा!!
- डॉ. व्ही. एन. शिंदे
उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

Web Title: With their 'fingers' green nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.