जयसिंगपूर बसस्थानकावर पुन्हा चोऱ्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:49+5:302021-07-22T04:16:49+5:30
जयसिंगपूर : येथील बसस्थानकावर पुन्हा चोरट्यांचा वावर वाढला आहे. महिला प्रवाशांच्या पर्समधून दागिन्यांची चोरी, पाकीटमारी असे प्रकार घडत आहेत. ...

जयसिंगपूर बसस्थानकावर पुन्हा चोऱ्या वाढल्या
जयसिंगपूर : येथील बसस्थानकावर पुन्हा चोरट्यांचा वावर वाढला आहे. महिला प्रवाशांच्या पर्समधून दागिन्यांची चोरी, पाकीटमारी असे प्रकार घडत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने प्रवाशांचीही संख्या वाढली आहे. याचा फायदा घेत चोरट्यांचा पुन्हा वावर वाढला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महिला प्रवासी वर्गातून होत आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेले जयसिंगपूर बसस्थानकावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता मिळाल्याने बसस्थानकात गर्दी वाढत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतदेखील वाढ झाली आहे. सोमवारी (दि. १९) दानोळी (ता. शिरोळ) येथील प्रवासी महिलेच्या पर्समधून ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्याने लांबविल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे महिला वर्गातून भीती व्यक्त होत आहे; तर पाकीटमारीचे प्रकारदेखील सुरू आहेत. बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. यापूर्वी सीसीटीव्ही व पोलीस सुरक्षेमुळे चोरीच्या घटनांना आळा बसला होता. मात्र, पुन्हा एकदा बसस्थानकावरील चोऱ्या वाढल्या आहेत. तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याबरोबरच सकाळी व सायंकाळच्या सत्रात पोलीस कर्मचाऱ्याची याठिकाणी नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
फोटो - २१०७२०२१-जेएवाय-०५- जयसिंगपूर येथील बसस्थानक.