महिलेला बेशुद्ध करून जबरी चोरी
By Admin | Updated: November 26, 2014 00:23 IST2014-11-26T00:19:44+5:302014-11-26T00:23:13+5:30
गडहिंग्लज येथील घटना : दागिने आणि रोख रकमेसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

महिलेला बेशुद्ध करून जबरी चोरी
गडहिंग्लज : येथील शशिकला दयानंद वाडेकर (वय २९, रा. नेवडे गल्ली, शिवाजी चौक, गडहिंग्लज) या विधवा महिलेला उठवून बेशुद्ध करीत अंगावरील, तसेच कपाटातील दागिन्यांसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सोमवारी रात्री अडीचच्या दरम्यान घडलेली ही घटना आज, मंगळवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
शशिकला हिच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असून, ती आपला मुलगा आदित्य (९) सह नेवडे गल्लीतील आपल्या घरात राहते. रात्री अडीचच्या सुमारास दरवाजावर कुणीतरी थाप मारली. त्यावेळी आपला भाऊ आल्याचे समजून शशिकला हिने दार उघडताच बाहेरील दोन काळे कपडे परिधान केलेल्या व तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या अज्ञातांनी शशिकला हिला रुमालातून उग्र वास दिला. तेव्हा ती बेशुद्ध
झाली.
चोरट्यांनी तिच्या गळ्यातील चेन, कानातील रिंगा, तसेच आदित्यच्या गळ्यातील लॉकेट आणि तिजोरीतील नेकलेस, चेन, टॉप्ससह रोख ११ हजार, असा एकूण सुमारे ७६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी सहा वाजता आदित्य उठल्यानंतर त्याला शशिकला दरवाजाजवळ हात-पाय बांधलेल्या अवस्थेत बेशुद्ध दिसली. आदित्यने शेजाऱ्यांसह शशिकलाचे शेजारीच राहणारे दीर शिवानंद वाडेकर यांना बोलाविले. त्यानंतर उपचार झाल्यानंतर शशिकला शुद्धीत आल्या आणि नेमकी घटना उघडकीस आली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश सोनवणे, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, आदींनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)
हात-पाय बांधून लुटमार
रात्री अडीचच्या सुमारास कुणीतरी दारावर थाप मारली असता बाहेर कोण आहे, याची खात्री न करता शशिकलाने दार कसे उघडले ? दार उघडण्यापूर्वी घरातील झिरो बल्ब सोडून मोठा बल्ब का नाही लावला? असे प्रश्न घटनास्थळी लोकांकडून उपस्थित केले जात होते.
घटनास्थळावर मुख्यालयातून श्वानपथकाला, तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. श्वानाने नेवडे गल्लीतून महालक्ष्मी मंदिराजवळून मुख्य रस्त्यापर्यंतचा माग काढला.