कोल्हापूरात मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी
By Admin | Updated: July 11, 2017 18:29 IST2017-07-11T18:29:22+5:302017-07-11T18:29:22+5:30
रोकडसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास : शाहूपुरी पाच बंगला परिसरातील घटना

कोल्हापूरात मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : शाहुपूरी पाच बंगला परिसरातील अनंत टॉवर्समधील मोबाईल विक्री-दुरुस्ती करणाऱ्या सर्व्हिस सेंटर कार्यालयाच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्याने रोख रक्कमेसह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले.
अधिक माहिती अशी, शाहुपूरी पाच बंगला परिसरात अनंत टॉवर्स कॉम्प्लेक्स आहे. येथील पहिल्या मजल्यावर गाळा नं. १३-१४ मध्ये बी-२ एक्स सर्व्हीस सलुशन इंडीया कंपनीचे सर्व्हीस सेंटर आहे. याठिकाणी मोबाईल विक्री व दुरुस्त केले जातात. निखिल राजाराम कुमठेकर (वय ३९, रा. दिप्ती पार्क शाहूपुरी) हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी सात वाजता ते कार्यालय बंद करुन घरी गेले. मंगळवारी सकाळी कर्मचारी सतिश बोरकर हे कार्यालयात आले. आतमध्ये पाहतात तर साहित्य विस्कटलेले होते. कॅश कॉन्टरमधील ३० हजार रुपये, आयफोन, हेडफोन, चार्जर, मोबाईल आदी साहित्य गायब असल्याचे दिसून आले.
आजूबाजूला पाहीले असता दरवाजाच्या शेजारी असलेल्या खिडकीचे लोखंडी गज वाकलेले दिसून आले. सहा इंच जागेतून चोरट्याने आत प्रवेश करुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांनी व्यवस्थापक कुमटेकर यांना फोनवरुन कळविले. त्यांनी शाहूपुरी पोलीसांना वर्दी दिली.
पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते जागीच घुटमळले. या परिसरातील ही तिसरी घरफोडी आहे. खिडक्यांचे गज वाकवून चोरी करणारा चोरटा अद्यापही पोलीसांच्या हाती लागलेला नाही. गेल्या दोन-तीन वर्षापासून हा चोरट्याने शहरात धुमाकूळ घातला आहे. रुईकर कॉलनीतील बंगलाही अशाच पध्दतीने फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता.
डिटेक्टर गायब
मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोरट्याने कॅमेऱ्यांची दिशा बदलली होती. तसेच चित्रिकरण एकत्र साठवून ठेवणारा डिटेक्टर मशिन त्याने गायब केला आहे. त्यामुळे चोरट्या हुशार व सराईत असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.