दत्त मंदिरातील चोरीचा उलगडा; दाम्पत्यास अटक
By Admin | Updated: July 17, 2014 00:34 IST2014-07-17T00:34:31+5:302014-07-17T00:34:53+5:30
सीसीटीव्ही उपयोगी पडले : महाडिक वसाहतीतील प्रकार; चांदीचा अडीच किलोंचा ऐवज जप्त

दत्त मंदिरातील चोरीचा उलगडा; दाम्पत्यास अटक
कोल्हापूर : रुईकर कॉलनी, महाडिक वसाहतमधील दत्त मंदिरात आज, बुधवारी पहाटे झालेल्या चोरीचा उलगडा शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत केला. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी किरण भगवान मोहिते (वय २३, रा. कनाननगर झोपडपट्टी), त्याची पत्नी पूजा (१९) यांना अटक केली. त्यांच्याकडून चांदीची छत्री, पादुका व आसन, असा सुमारे अडीच किलोंचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, महाडिक वसाहतमधील दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिराच्या गाभाऱ्यातील दहा वर्षांपूर्वीची दीड किलो वजनाची चांदीची छत्री, ५०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका व आसन चोरट्याने लंपास केल्याचे दिसले. हा प्रकार पुजारी दत्तात्रय पुरोहित हे मंदिर उघडण्यासाठी पहाटे पाचच्या सुमारास आले असता उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी त्रिमूर्ती भक्त मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र बापूसाहेब जगताप (मूळ गाव - देवाळे, ता. पन्हाळा, सध्या रा. महाडिक वसाहत) यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव हे घटनास्थळाची पाहणी करताना मंदिरात असलेल्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास एक व्यक्ती मंदिरात प्रवेश करताना दिसून आली. ती व्यक्ती पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याचे नाव किरण भगवान मोहिते असल्याचे लक्षात आले. त्यानुसार जाधव यांनी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना मोहिते याचा शोध घेण्यास सांगितले. दरम्यान, मोहिते हा पत्नी पूजासमवेत केशवराव भोसले नाट्यगृहासमोरील रस्त्यावर फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळताच जाधव यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली असता पूजा मोहिते मिळून आली. तिच्याकडे पती किरणबाबत चौकशी केली असता सुरुवातीस ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच तिने चोरीची कबुली दिली, तर किरण मोहिते हा पंचायत समिती करवीर येथे चोरीच्या पादुका विक्री करण्यासाठी फिरत असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. पोलीसांना पाहून तो पळत सुटला. अखेर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)
अशी केली चोरी...
संशयित किरण मोहिते व त्याची पत्नी पूजा हे दोघेजण आज पहाटे चार वाजता मंदिराजवळ गेले. पूजा मंदिराच्या बाजूला अंधारात थांबली, तर किरणने मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून मंदिरातील गाभाऱ्यातील चांदीची छत्री, पादुका व आसन काढून घेतले. चांदीची छत्री मोठी व जड असल्याने ती उमेश शिंदे-सरकार यांच्या रिकाम्या प्लॉटमधील कोंडाळ्यात लपवून ठेवली. त्यानंतर दोघेही तेथून घरी आले. मंदिरातील ‘सीसीटीव्ही’मध्ये संशयित किरणचे फुटेज चित्रीत झाले होते. पूजा अंधारात उभी राहिल्याने तिचे फुटेज ‘सीसीटीव्ही’मध्ये आले नव्हते. त्यानंतर पुन्हा चोरी करण्यासाठी ते जागा शोधण्यासाठी बाहेर पडले असता पूजा पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
शहरात भटकंती
किरण मोहिते व त्याची पत्नी पूजा हे नेहमी लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, बिंदू चौक, खासबाग मैदान, शाहूपुरी, स्टेशन रोड परिसरात दिवसभर फिरताना दिसत होते. रस्त्यावर एकमेकांची चेष्टा-मस्करी करत असताना नागरिक त्यांच्याकडे कुतूहल