‘बिद्री’तील चोरीचा छडा
By Admin | Updated: May 31, 2014 01:16 IST2014-05-31T00:52:36+5:302014-05-31T01:16:03+5:30
चोरट्यास अटक : पावणे सहा लाखांचा ऐवज जप्त

‘बिद्री’तील चोरीचा छडा
बोरवडे : बिद्री (ता. कागल) येथे बुधवारी सतीश ज्ञानदेव पाटील यांच्या घरी झालेल्या पावणे सहा लाखांच्या चोरीचा छडा लावण्यात मुरगूड पोलीसांना अवघ्या चोवीस तासांत यश आले. चोरीच्या मोबाईलवरून केलेल्या कॉलद्वारे चोरीची दिशा बदलणारा संशयित कृष्णात साताप्पा गायकवाड (वय १९) याला मुद्देमालासह मुरगूड पोलिसांनी आज, शुक्रवारी अटक केली. तसेच पावणेसहा लाखांच्या चोरीचा तपास लागला. बिद्री येथील सतीश पाटील यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने पावणेसहा लाख रुपयांची चोरी केली होती. एवढी धाडसी चोरी स्थानिकानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पाच संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बिद्रीच्या कृष्णात गायकवाड याचाही यामध्ये समावेश होता. दरम्यान, आज सकाळी संशयित कृष्णात गायकवाड याने मोबाईलवरून माजी पंचायत समिती सदस्य नंदू पाटील यांना फोन करून डवरीला ताब्यात घ्या, नाहीतर चोरीचा माल गेलाच म्हणून समजा असे सांगितले. नंदू पाटील यांनी तुझे नाव सांग म्हणताच नाव कशाला पाहिजे पोलिसांना पाठवा, असे सांगितले. पुन्हा दुपारी बारा वाजता त्याच मोबाईलवरून नंदू पाटील यांना फोन आला. तेव्हा त्याने अजून पोलिसांना कळविले नाही काय, असे सांगितले. तेव्हा नंदू पाटील याना संशय आला व पाटील यांनी हा मोबाईल नंबर मुरगूड पोलिसांना दिला. मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हस्के यांनी तो क्रमांक डिक्टेट केल्यावर बिद्रीतील साताप्पा सखाराम पाटील यांच्या नावे असल्याचे कळले. त्यांच्याशी संपर्क साधला असता आपला मोबाईल चार महिन्यांपूर्वी चोरीला गेल्याचे सांगितले. मुरगूड पोलिसांनी दुपारी सर्वच संशयिताना सोडून दिले. त्यावेळी चोरीच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करून पल्लू डवरीला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न गायकवाड याने केला. गायकवाड याने हे प्रकरण आपल्या अंगलट येणार म्हणून मोबाईलचे सिमकार्ड काढून टाकले. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच कृष्णात गायकवाड याने सतीश पाटील यांच्या घरी रात्री सव्वा आठच्या सुमारास चोरी केल्याचे कबूल केले व त्याने चोरीचा मुद्देमाल बिद्री कॉलनीतील तामगाव चाळीतील खापर्यामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले व तो ठेवलेला चोरीचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. सोन्याचे गंठण, राणी हार, नेकलेस यासह पस्तीस हजार रुपये रोख असा पावणेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल मुरगूड पोलिसांनी गायकवाडकडून जप्त केला आहे. चोवीस तासांत चोरीचा छडा लावणार्या मुरगूड पोलिसांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर )